HomeRatnagiriरत्नागिरी रेल्वे स्थानक पार्किंग वाद; युवासेना आक्रमक, मोफत 'ड्रॉप अँड गो' झोनची...

रत्नागिरी रेल्वे स्थानक पार्किंग वाद; युवासेना आक्रमक, मोफत ‘ड्रॉप अँड गो’ झोनची मागणी

प्रवाशांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टीमेटम; तीव्र आंदोलनाचा इशारा.

रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना सोडण्यासाठी जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिक आणि वयोवृद्ध प्रवाशांची पार्किंग ठेकेदाराकडून सुरू असलेली आर्थिक लूट आता चांगलीच तापू लागली आहे. स्थानक परिसरातील या अनिर्बंध कारभाराविरोधात युवासेना आक्रमक झाली असून, कोकण रेल्वे प्रशासनाला थेट धारेवर धरण्यात आले आहे. प्रवाशांना स्थानकावर विनासायास सोडता यावे, यासाठी तात्काळ मोफत ‘ड्रॉप अँड गो’ (Drop and Go) झोन सुरू करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी युवासेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नेमका प्रकार काय?

पूर्वी रेल्वे स्थानक परिसरात आजारी, वृद्ध किंवा इतर प्रवाशांना ट्रेनमध्ये सोडण्यासाठी येणारी वाहने काही मिनिटे थांबवण्याची मुभा होती. मात्र, अलीकडेच स्थानकाच्या आतील रस्त्यावर डिव्हायडर टाकून ती सोय पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. परिणामी, आपल्या कुटुंबीयांना किंवा पाहुण्यांना केवळ दोन मिनिटांसाठी सोडायला आलेल्या वाहनचालकांनाही सक्तीने पूर्ण पार्किंग शुल्क भरावे लागत आहे. जर कोणी पैसे देण्यास नकार दिला, तर त्यांना मुख्य रस्त्यापासून लांबच वाहने उभी करावी लागतात. याचा सर्वाधिक मनस्ताप ज्येष्ठ नागरिक, माता-पिता आणि आजारी रुग्णांना सहन करावा लागत आहे.

युवासेनेचा कोकण रेल्वे प्रशासनाला अल्टिमेटम

या सर्व मनमानी कारभारावर कडाडून विरोध दर्शवत, युवासेनेचे माजी रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांनी कोकण रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. ही व्यवस्था प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की नागरिकांच्या खिशातून पैसे काढण्याचे माध्यम, असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

युवासेनेच्या प्रमुख मागण्या:

१. मोफत ‘ड्रॉप अँड गो’ झोन: प्रवाशांना स्थानकावर सुखरूप सोडण्यासाठी किमान १० मिनिटांचा मोफत झोन तात्काळ सुरू करण्यात यावा.

२. मनमानी शुल्क वसुलीला आळा: ठेकेदाराची दादागिरी आणि अवाजवी वसुली त्वरित थांबवण्यात यावी.

३. पारदर्शकता हवी: पार्किंगचे अधिकृत दरफलक दर्शनी भागात लावून प्रत्येक वाहनचालकाला अधिकृत पावती देणे सक्तीचे करावे.

४. विशेष सुविधा: वयोवृद्ध, दिव्यांग आणि महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था निर्माण करावी.

८ दिवसांचा अल्टीमेटम आणि जनआंदोलनाचा इशारा

पुढील ८ दिवसांच्या आत रेल्वे प्रशासनाने यावर कोणतीही ठोस कारवाई करून प्रवाशांना दिलासा दिला नाही, तर शिवसेना आणि युवासेना स्टाईलने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा सज्जड दम युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular