कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर प्रथमच यंदा जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्या बरोबरच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मे महिन्याच्या २३ दिवसांत जिल्ह्यात ३६ अपघात झाले असून त्यात १८ जण ठार, तर ५५ जण जखमी झाले आहेत. त्यातील बहुतांश अपघात एक दिवस आड मुंबई – गोवा महामार्गावर झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे लोक घराबाहेर पडणे टाळत होते. सरकारी निर्बंधांपेक्षा कोरोनाच्या भीतीने लोक आपले घर, गाव सोडून बाहेर जात नव्हते. मात्र, यंदा वातावरण निवळले आहे. कोरोना जवळजवळ हद्दपार झाल्यात जमा आहे. त्यामुळे यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात बहुसंख्य पर्यटक आले आहेत. रत्नागिरी, गुहागर, दापोली, मंडणगड यांसारख्या किनारपट्टीच्या भागात तर पर्यटकांची वर्दळ खूपच वाढली आहे. वाहनांची वाढलेली वर्दळ लक्षात घेता बहुतांश पर्यटक हे खासगी वाहनानेच आले असल्याचे दिसत आहे. सद्यःस्थितीत मुंबई – गोवा महामार्गावर आणि शहरांतर्गतही वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
सद्य स्थितीत खेड तसेच चिपळूण तालुक्यातील बऱ्याचशा महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. तेथील वळणे कमी झाली आहेत. पण तेथील अपघात अजूनही कमी झालेले नाहीत. चांगल्या रस्त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. कोकणाबाहेरील वाहनचालकांना या वळणांचा अंदाज येत नाही. त्यामुळे गाड्या रस्त्याशेजारी कलंडण्याचे प्रमाण अधिक आहे. महामार्गावर शासकीय तसेच खासगी रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध होतात. नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका थोड्याच वेळात अपघातस्थळी पोहोचतात. त्यामुळे अपघातांची संख्या अधिक असली तरी वेळेत उपचार मिळत असल्याने मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे.