गेल्या आठवड्यात मृत माशांवरून दाभोळ खाडीतील प्रदूषण चर्चेत आले असतानाच सोमवारी लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांनी सांडपाणी दिवसाढवळ्या नाल्यातून सोडल्याचा प्रकार उघडकीस आला. कोतवली खाडीला मिळणारा हा नाला सोमवारी पहाटेपासून लालसर रंगाच्या सांडपाण्याने तुडुंब भरून वाहत होता. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार संतप्त झाले. याची तक्रार केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी लोटेत जाऊन नाल्याची तपासणी केली. तसेच ग्रामस्थांनी सीईटीपीत जाऊन झालेल्या प्रकाराचा जाब विचारला.
गेल्या आठवड्यात दाभोळखाडीमध्ये सर्वत्र मृत मासे आढळले. यानंतर संघर्ष समितीने केलेल्या तक्रारीनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळ व मत्स्य विभागाने खाडीची पाहणी केली. तसेच मृत मासे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. केतकी ते कारूळपर्यंत मृत निमासे आढळत असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. दरम्यान, संघर्ष समितीने या प्रकाराला सीईटीपीला जबाबदार श्रीधरल्यानंतर त्यांचे आरोप सीईटीपीकडून फेटाळण्यात आले. प्रक्रिया केलेले पाणीच सोडत असल्याचा दावा अध्यक्ष सतीश वाघ यांनी केला होता. मात्र, या दाव्यानंतर खाडीतील मासे नेमके कशाने मृत झाले, असा प्रश्न मच्छीमार उपस्थित करत असतानाच सोमवारी लोटेतील कारखान्यांनी नाल्यात आपले सांडपाणी सोडल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले.
सोमवारी पहाटेपासून एमआयडीसीतून सीईटीपीच्या बाजूने कोतवली खाडीला मिळणाऱ्या नाल्यात लालसर रंगाचे पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आल्यावर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व सीईटीपी’कडे तक्रार दिली. मात्र, सीईटीपी’ने हे पाणी आमचे नसून एमआयडीसीतून येणाऱ्या नाल्याचे असल्याचे सांगत हात वर केले. काही ग्रामस्थांनी थेट ‘सीईटीपी’त जाऊन घडलेल्या प्रकाराची विचारणा केली. यावर नाल्यात सोडण्यात आलेल्या पाण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मडळाला माहिती दिली गेली असल्याचे ‘सीईटीपी’कडून सांगण्यात आले.
दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नाल्याची तपासणी करत कोतवलीपर्यंत पोहोचले असल्याची माहिती उपलब्ध झाली. दूषित पाण्यावरून येथे अधिकारी व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने तणावाचे वातावरण बनले होते. दूषित सांडपाण्यावरून सीईटीपी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि उद्योजक हात वर करत आहेत. संयुक्तपणे चर्चेला ते सामारे जात नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीत ग्रामस्थांसमोर या चारही विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेण्याची मागणी घाणेखुंट ग्रामस्थांनी केली आहे.