पालिकेच्या उत्तम नियोजनामुळे यंदाच्या उन्हाळ्यात शहरवासीयांचा घसा कोरडा पडण्याची वेळ आली नाही. टंचाईच्या गंभीर स्थितीतही शहराला पाणीपुरवठा झाला. सुमारे साडेचार महिन्यांनंतर रविवारपासून (ता. १६) शहराला नियमित पाणीपुरवठा होणार आहे. पावसामुळे धरणात पाणीसाठा २५ वरून ३१ टक्के इतका वाढल्याने पालिकेने हा निर्णय घेतल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. अल निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेचा मॉन्सूनवर मोठा परिणाम झाल्याने सरासरी पर्जन्यमानापेक्षा गतवर्षी कमी पर्जन्यमान झाले. परिणामी, शिळ धरणात कमी पाणीसाठा झाला, तसेच वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीपातळी घटत आहे.
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मॉन्सूनच्या आगमनापर्यंत धरणातील शिल्लक पाणीसाठा पुरवण्यासाठी पाणीकपात अनिवार्य होते. त्यामुळे मॉन्सूनच्या आगमनापर्यंत १ मार्च २०१४ पासून प्रत्येक आठवड्याच्या सोमवार आणि गुरुवारी या २ वारी शहरातील पाणीपुरवठा बंदचा निर्णय घेण्यात आला होता. उष्णतेमुळे पाण्याच्या पातळीत वारंवार घट होत होती. १५ जूनपर्यंत पाणी पुरावे यासाठी पालिकेने पुन्हा पाणी कपात करत दिवसाआड पाणीपुरवठा केला. १३ मे रोजी हा निर्णय घेण्यात आला होता; परंतु आता चांगला पाऊस सुरू झाला आहे. पाणी वाढल्यामुळे उद्यापासून शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.
कपातीचा निर्णय यशस्वी – शहरवासीयांना उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण करावे लागू नये, यासाठी आम्ही चार महिने आधीच पाणी कपातीचा निर्णय घेतला. सुरुवातीला आठवड्यातून एकवेळा नंतर आठवड्यातून दोनवेळा आणि पाणीसाठा अगदी २५ टक्क्यांवर आल्यानंतर दिवसाआड करण्याचा आम्ही निर्णय घेतला. अनेकांनी या निर्णयाबाबत बोटे मोडली; परंतु हा निर्णय पथ्यावर पडला आणि पावसाळ्यापर्यंत शहवासीयांना पाणीपुरवठा करण्यात यशस्वी झालो, अशी माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर आणि पाणी अभियंता अविनाश भोईर यांनी दिली.