खेड शहरात वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. वाहतुकीला शिस्त लावून बेदरकारपणे रस्त्यालगत कुठेही वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिस निरीक्षक नितीन भोयर अॅक्शन मोडवर आले आहेत. वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यास यापुढे दंड न आकारता थेट गुन्हाच दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत ५ वाहनचालक कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. शहरात पार्किंगसाठी निश्चित जागाच नसल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीरच बनत आहे. त्यातच स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने आवारात वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
या ठिकाणी वाहने उभी केल्यास थेट कायदेशीर कारवाईची तंबीच नगरपालिकेने नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ फलक लावून दिली आहे. यामुळे वाहने उभी करायची कुठे? असा प्रश्न वाहनचालकांना सतावत आहे. मुख्य मार्गासह शहराच्या बाजारपेठेतील रस्ते अरुंद आहेत. त्यातच बाजारपेठेत कुठेही अन् कशाही पद्धतीने वाहने उभी करून दुकानांमध्ये वस्तू खरेदीसाठी जाणारे ग्राहक आपल्या ताब्यातील दुचाकी अथवा चारचाकी रस्त्यातच उभे करत असल्याने वाहतूककोंडीला आमंत्रण मिळवून अन्य वाहनचालकांना रणरणत्या उन्हात घाम फुटत आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी कारवाईचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात होती; मात्र आता कुठेही अन् कशाही पद्धतीने वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यास आता थेट गुन्हेच दाखल होणार आहेत. गेल्या दोन दिवसापासून ही मोहीम राबवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी २ वाहनचालक, तर शनिवारी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.