25.7 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024
HomeRatnagiriरत्नागिरी शिवसृष्टीतील मावळ्यांची मोडतोड, संशयित मद्यपीला अटक

रत्नागिरी शिवसृष्टीतील मावळ्यांची मोडतोड, संशयित मद्यपीला अटक

संशयितावर कडक कारवाई करण्याबाबत शहर पोलिस निरीक्षकांची भेट घेतली.

शहरातील मारुती मंदिर सर्कलमध्ये उभारलेल्या शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची काल रात्री एका मद्यपीने मोडतोड केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून त्या मद्यपीला ताब्यात घेतले. पालिकेने यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. भावना दुखावलेल्या शिवसैनिक आणि शिवप्रेमी गोळा झाले. त्याचा निषेध करून संशयितावर कडक कारवाई करण्याबाबत शहर पोलिस निरीक्षकांची भेट घेतली. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहर पोलिस रात्री गस्तीला असताना पहाटे अडीचच्या सुमारास मारुती मंदिर सर्कलमधील ‘शिवसृष्टी’ मधील मावळांच्या पुतळ्यांची एकाने मोडतोड केल्याचे समजले.

पोलिसांची सेकंड मोबाईलमधील पेट्रोलिंग अंमलदार घटनास्थळावर गेल्यानतंर त्यांनी एका मद्यपीला हटकले असता तो मारुती मंदिर येथून एसटी बसस्थानक रोडच्या दिशेने पळून गेला. या घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ घटनास्थळी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याची सेकंड मोबाईल पेट्रोलिंग व सेक्टर अंमलदार यांच्या मदतीने आठवडा बाजार येथून त्यास तत्काळ ताब्यात घेतले. या मद्यपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात सार्वजनिक संपत्तीस “हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३(१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. संदेश गावडे (वय २४, रा. रत्नागिरी शहर) असे त्याचे नाव असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झाले. त्याला अटक केली आहे.

संशयित आरोपी संदेश गावडे याला आज न्यायालयापुढे हजर करण्यात आले. या घटेनेचे गांभीर्य लक्षात घेता रत्नागिरी पोलिस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये अथवा अफवांचे बळी पडू नये. पालिका आणि शिवसैनिकांनी तत्काळ मोडतोड करण्यात आलेल्या मावळ्यांचे पुतळे पिशवीने झाकून ठेवले. शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, राजन शेट्ये, विजय खेडेकर आदी शहर पोलिस ठाण्यात गेले. संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

मनसेकडून निषेध – शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे मनसे पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन अप्रिय घटनेचा निषेद नोंदवला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हेतूने अशाप्रकारची घृणास्पद कृत्ये होत आहेत का, याबाबत सखोल तपास व्हावा, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहर संघटक अमोल श्रीनाथ, उपशहराध्यक्ष राजेश नंदाने यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular