गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेंचे आरक्षण अवघ्या मिनिटभरात फुल्ल झाल्याने कोकणवासियांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कोकणातील नागरिकांच्या या संतापाची गंभीर दखल रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत यांनी घेतली. यासंदर्भात गुरूवारी त्यांनी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा विभागीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेऊन चर्चा केली. गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर यावर्षी. किमान ३५० गाड्या चालवाव्यात अशी मागणी राऊत यांनी केली आहे. खा. विनायक राऊत यांनी कोकणातील प्रवाशांच्या तक्रारींविषयी संजय गुप्ता यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
किमान ३५० गाड्या सोडाव्यात आणि त्याचे आरक्षण किमान २ महिने आधी जाहीर करावे. तिकीट आरक्षणात कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी राऊत यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने कोकण रेल्वेच्या विभागीय संचालकांकडे केली. रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख या शिष्टमंडळात विनायक राऊत यांच्यासमवेत सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, सुधीरभाऊ मोरे यांचा समावेश होता. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मांगणीदेखील यावेळी करण्यात आली.