रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादीचे उप जिल्हाध्यक्ष मिलिंद कीर यांनी मुख्याधिकाऱ्याना साळवी स्टॉप येथे सायंकाळच्या सुमारास घनकचऱ्याला आग लावत असल्याने, धुराचे लोट उसळतात. यामुळे शिवाजीनगर, टीआरपी, साळवी स्टॉप आदी परिसरामध्ये प्रदूषणाने नागरिक हैराण झाले आहेत. हवेतील दुषित धुरामुळे श्वसनाचे विकार वाढीस लागले आहेत. या प्रदूषणाला रत्नागिरी नगर सर्वस्वी परिषदच जबाबदार असल्याचे कीर यांनी म्हटले आहे.
घनकचरा प्रकल्प उभारा अन्यथा आपण रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारू असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, घनकचरा प्रकल्पाचा डीपीआर तयार होऊन टेंडर प्रक्रीया झाली आणि त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेने अचानक टेंडर प्रकिया रद्द केली. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषद लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा त्यांनी थेट आरोप केला आहे. काही दिवसांपासून साळवी स्टॉप येथील कचऱ्याच्या डंपिंग ग्राउंडमधून येणारा धूर आणि वासामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. येत्या १५ दिवसांमध्ये घनकचरा प्रकल्पाची कार्यवाही झाली नाही तर आम्ही रत्नागिरी नगर परिषद आणि मुख्याधिकार्यांविरोधात आंदोलन करु असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले आहेत की, रत्नागिरी नगर परिषदेला सन २००४-०५ रोजी जिल्हाधिकारी यांजकडून घनकचरा प्रकल्पासाठी दांडेआडोम येथे सुमारे चार हेक्टर जमीन शासनाने दिली आहे. तेथे घनकचरा प्रकल्पाला स्थानिक लोकांनी आक्षेप घेतला त्यामुळे तेथे तत्कालीन महसुल मंत्र्यानी स्थगित केला होता. घनकचरा प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पालिकेच्या बाजूने लागूनही प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न कायम आहे. याबाबतची सर्व जबाबदारी ही नगर परिषदेची आहे.
कीर २३ डिसेंबर २०११ रोजी नगराध्यक्ष झाले आणि १०० मिटर रस्त्याची जागा अधिग्रहण करण्यासाठी कार्यवाही सुरु केली. दरम्यान या प्रकरणाला लोकांनी कोर्टामध्ये चॅलेंज केले आणि हे प्रकरण शेवटी सुप्रिम कोर्टापर्यंत गेले. सुप्रिम कोर्टात नगर परिषदेच्या बाजून निकाल लागला नगर परिषदेला सदर भुखंडापर्यंत रस्ता मिळाला आणि घनकचरा प्रकल्प होण्यासाठीचा मार्ग प्रशस्त झाला.