कोकणाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक प्राचीन गड, किल्ले, मंदिरे समाधी इत्यादी विविधता कोकणात आहे. त्यातील संगमेश्वरला ऐतिहासिक भूमी समजली जाते. कसबा संगमेश्वर परिसराला फार मोठी ऐतिहासिक परंपरा असून चालुक्य राजवटीमध्ये शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार असणारी मंदिरे वास्तू तिथे आहे. कसबा-संगमेश्वर मध्ये देश-विदेशातील पर्यटक वरचेवर भेट देत असतात. या गावात संभाजी महाराजांना दगाबाजीनं पकडण्यात आल्याने येथे संभाजी स्मारक उभारलेले असणार या अपेक्षेने इतिहासप्रेमी या परिसराला भेट देतात.
छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या भूमिपूजन समारंभानंतर त्या वास्तूकडे आज ३५ वर्षांनंतरही दुर्लक्षच करण्यात आले आहे. गावात १९९२ पर्यंत या गावात संभाजी महाराजांची अर्धप्रतिमाही नव्हती. इतिहास प्रेमींनी त्यांचे स्मारक असावे असी मागणी केली. संभाजी राजांचे भव्यदिव्य स्मारक उभारायचे हा हेतू निश्चितच अभिमानास्पद होता; मात्र जिद्द आणि चिकाटीचा अभाव दिसून आल्याने ६५ लाखांपेक्षा अधिक निधी खर्च होऊन देखील स्मारकाची झालेली दुर्दशा अतिशय विदारक आहे.
भूमिपूजनानंतर स्मारकाचं काम वेगाने पुर्ण होण्याची अपेक्षा होती पण निधी अपुरा पडल्याने तिथेही अपेक्षाभंग झाला. १९९२ ला सात फुटांपर्यंत भिंतींचे बांधकाम झाल्यावर निधी अभावी पुन्हा रखडले. त्यानंतर मुळ आराखड्यात बदल करण्यात आला. यानंतर काम सुरू व्हायचं पण निधी संपल्यावर बंद पडायचे. विविध लोकप्रतिनिधींनीही यामध्ये लक्ष घातले. जिल्हा नियोजन मंडळानेही भरीव निधी दिला. सर्व मिळून जवळपास ६५ लाखांपेक्षा अधिक निधी खर्च झाला असला तरी या स्मारकाची दुर्दशा संपलेली नाही. छ. संभाजी महाराज स्मारकाची इमारत पूर्ण झाली; मात्र याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने ही इमारत प्रेमीयुगुलांचे, मद्यपींचे, गर्दुल्यांचे आडोशाचं ठिकाण बनले. स्मारकासाठी तयार करण्यात आलेल्या इमारतीचा हा असा वापर होऊ लागल्याने संगमेश्वर येथील संभाजीप्रेमी युवकांनी पर्शुराम पवार यांच्या नेतृत्वाखाली शासकीय यंत्रणेसह पोलिस यंत्रणेचे लक्ष वेधले.