चिपळूण आणि खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील केतकी करंबवणे खाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून विनापरवाना चोरटी वाळू उत्खनन करण्यासाठी तीन सक्शन पंप लावण्यात आले आहेत. याकडे महसूल प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. वाळू उत्खननासाठी लावण्यात आलेले पंप हे खेड तालुक्याच्या सीमेलगत लावण्यात आले आहेत. या ठिकाणी भोई समाज मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या व्यवसायाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या काही महिन्यापासून भर पावसात तीन सक्शन पंप लावण्यात आले असल्याने मच्छीमार बांधवांची वारंवार मच्छीची जाळी तुटत आहे.
काही दिवसांपूर्वी रघुनाथ कासेकर या मच्छीमार बांधवाच्या मच्छीमारी करणाऱ्या बोटीचे नुकसान झाले होते. वाळू व्यावसायिकाकडून तोडमोड झाली होती. ही वाळू संपूर्ण खेड तालुक्यातील करंजी गावच्या ठिकाणी बार्जच्या माध्यमातून सक्शन पंपाने भरली जात असतानाही वाळू करंजी गावच्या ठिकाणी प्लॉटवर उतरवली जात आहे. इथून संपूर्ण खेड-दापोली-मंडणगड तालुक्याला वाळू पुरवठा केली जात आहे. रात्रंदिवस डंपर चालू असल्याने वाळूने भरलेले खेड-बहिरवली आणि कोरेगाव संगलट रस्त्याची या डम्पराच्या माध्यमातून चाळण झाली आहे. यामुळे रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत आहेत. वाळूने भरलेले डंपर हे या रस्त्यावर रात्रंदिवस धावत आहेत.