मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा हिरवा केला जाणार आहे. खेड, पोलादपूर, महाड या भागात पाच हजार नव्या रोपांची लागवड केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता अमोल माडकर यांनी दिली. त्यासाठी खड्डे मारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. शिवाय वृक्षारोपणासाठी रोपांची उपलब्धता करण्यात आली आहे. रस्त्याच्या मध्यभागी वृक्ष लागवड करून ती जोपासण्यासाठी महामार्ग कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे, असे माडकर यांनी सांगितले. पनवेल-पळस्पे इथून इंदापूरपर्यंत पहिला टप्पा आणि त्यानंतर इंदापूर ते कशेडी असा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला.
पुढे कशेडीपासून थेट सिंधुदुर्गपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सरकारने सुरू केले आहे. या संपूर्ण कामामध्ये महामार्गाच्या दुतर्फा असलेले महाकाय वृक्षांचा बळी गेला. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावरील सावली नष्ट झाली. महामार्गावर थांबून थोडा वेळ आराम करता येईल, अशी परिस्थिती राहिली नाही. चिपळूणमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे. उपअभियंता माडकर म्हणाले, चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून आम्ही शंभर टक्के वृक्ष लागवड करून घेणार आहोत.