२०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष ऑनलाईनशिक्षण प्रणालीद्वारे घेण्यात आले. काल पासून सुरु झालेले २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष देखील कोरोना संक्रमणामुळे अद्याप तरी ऑनलाईनच घेण्यात येणार आहे. शालेय शैक्षणिक पाठ्यक्रमाव्यतिरिक्त इतर शालांतर्गत घेतल्या जाणार्या परीक्षा सुद्धा यावेळी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत.
मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत दरवर्षी जी होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा घेतली जाते ती सुद्धा यावर्षी ४ टप्प्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली आहे. त्या परीक्षेमध्ये खेड रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या, इयत्ता ९वी मधील धनंजय धुमाळ या विद्यार्थ्याने कांस्य पदक मिळवून, बालवैज्ञानिक पुरस्कार मिळविला आहे.
हि मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेचे स्वरूप प्रथम पातळी वस्तुनिष्ठ प्रश्न, द्वितीय पातळी प्रात्यक्षिक परीक्षा, अंतिम पातळी कृतीसंशोधन आणि मुलाखत असे होते. खेड रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या, इयत्ता ९वी मधील धनंजय धुमाळ या विद्यार्थ्याने होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये कोविड-१९ आजार, संक्रमण, निदान, उपचार आणि लसीकरण या विषयावर स्वत: कृतिसंशोधन केले. धनंजय धुमाळ या विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती हि अभ्यासू असल्याने जिद्द, आत्मविश्वास आणि बुद्धीमतेच्या जोरावर त्याने चारही स्तर उत्तमरित्या पार पाडत, उपस्थित परीक्षकांची मने जिंकून घेतली आणि कांस्य पदकावर स्वत:चे नाव कोरविले.
धनंजयच्या यशामुळे सर्व स्तरातून त्याच्यावर आणि रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. धनंजयच्या या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, विज्ञान विषय शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रशालेकडूनसुद्धा धनंजय याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.