24.6 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeRatnagiriनिवळीत सव्वाआठ लाखांचा गुटखा जप्त

निवळीत सव्वाआठ लाखांचा गुटखा जप्त

वाहनामध्ये विविध कंपन्याचा गुटखा, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल सापडला.

बंदी असलेल्या गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेने पकडली. तालुक्यातील निवळी येथे ही कारवाई केली. कारवाईत आठ लाखांचा गुटखा आणि वाहन असा १५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल बलवंत घोरपडे (वय ३२, रा. मिरज खटाव, सांगली) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई आज सायंकाळी चारच्या सुमारास झाली. जिल्ह्यात हानिकारक गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती.

त्यानुसार जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांची मदत घेऊन प्रशासनाने ही कारवाई केली. आज सकाळी अन्न सुरक्षाचे अधिकारी वि. जे. पाचपुते, गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस फौजदार आकाश साळुंखे यांच्यासह पथकाने निवळी येथे सकाळी साडेसात वाजता सापळा रचला. साडेआठच्या सुमारास सांगलीहून श्रीक्षेत्र गणपतीपुळेकडे जाणारी मोटार (एमएच ०९ एपी ४५४५) तपासणी केली. तेव्हा या वाहनामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी तंबाखू असा सुमारे ८ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला.

वाहनाची किंमत ७ लाख २५ हजार असून १५ लाख २० हजार ११६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या वाहनात सूरज राजू साळुंखे व वाहन चालक विशाल घोरपडे दोघे होते. घोरपडे वाहन चालवत होता. त्यांची चौकशी केली असता बंदी असलेला गुटखा घेऊन गणपतीपुळे येथे जात असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने संशयितांना ताब्यात घेतले. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित चालक विशाल घोरपडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

गुटखा सेवनापासून दूर राहा – गुटखा विक्री बंदी आहे. प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू असली तरी चोरटी वाहतूक केली जात आहे. या हानिकारक पदार्थामुळे नागरिकांना कर्करोग होण्याची भीती आहे. जनतेने या सेवनापासून दूर राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular