सन २००५ साली चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानात खासदार शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर आता तब्बल १८ वर्षानंतर शरद पवार यांची जाहीर सभा चिपळूणमध्ये सोमवारी होत आहे. ही निवडणूक प्रचार सभा नसली तरी शरद पवारांची ही सभा कोकणातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरण्याची श्यक्यता आहे. कोकणात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांना मोठे वलय आहे. दोघांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचबरोबर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे त्यांचे दौरे असुदे किंवा जाहीर सभा असो, प्रचंड उत्सुकता असते.
सहाजिकच त्यांच्या सभेला होणारी गर्दी देखील प्रचंड असते. तसेच या नेत्यांच्या सभा ऐतिहासिक तसेच कोकणातील राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरल्या आहेत. अनेकवेळा कोकणातील राजकारण या दोन्ही नेत्यांवर अवलंबून राहिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष देखील आशा सभांकडे राहिले आहे. खासदार शरद पवार यांचे चिपळूणवर वेगळे प्रेम राहिले आहे. स्व. गोविंदराव निकम, स्व. नाना जोशी, स्व. नंदू पवार यांच्याशी शरद पवार यांचे घनिष्ठ पारावारीक सबंध राहिले आहे. त्यामुळे चिपळूणमध्ये अनेकवेळा येणेजाणे सुरूच असे.
चिपळूणचा महापूर तसेच तिवरे धरण दुर्घटनेच्या वेळी शरद पवार सर्वात प्रथम चिपळूणमध्ये धावून आले होते. परंतु त्यांची जाहीर सभा येथे क्वचितच झालेली आहे. पण ज्या-ज्यावेळी त्यांची जाहीर सभा झाली त्या- त्यावेळी येथील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे. सन २००५ साली चिपळूण मधील भव्य आशा पवन मैदानावर शरद पवार यांची जाहीर सभा झाली होती. या सभेत त्यावेळचे शिवसेनेचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता. या सभेने फक्त चिपळूणच्याच नव्हे तर संपूर्ण कोकणातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली होती.
भास्कर जाधव सारख्या आक्रमक व धाडसी नेतृत्वाला पक्षात घेऊन शरद पवारांनी अनेकांना राजकीय धक्का तर दिलाच पण त्याहीपेक्षा कोकणात कमकुवत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला जबरदस्त अशी उभारी देखील मिळवून दिली होती. पुढे अनेक वर्षे या सभेचे परिणाम राजकारणात उमटत राहिले होते. त्या सभेनंतर सुमारे १८ वर्षानंतर आता सोमवारी शरद पवार यांची चिपळूणमध्ये जाहीर सभा होत आहे. निवडणूक प्रचाराची ही सभा नसली तरी सभेला मोठी राजकीय किनार लाभली आहे.