राज्यात काँग्रेसचे प्रमुख नेते भाजपसह शिवसेनेत प्रवेश करत असतानाच राजापूर तालुक्यातील काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आणि वाटुळच्या सरपंच नीता चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याबरोबर ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो ग्रामस्थही शिवसेनेत दाखल झाले आहेत. या प्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणात शिवसेनेची (शिंदेगट) ताकद वाढली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्यासह उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू यांनी चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेत स्वागत केले.
या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले, अपूर्वा सामंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काही दिग्गज नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजप, शिवसेना (शिंदे गट) पक्षामध्ये प्रवेश केला. राज्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकीय उलथापालथी होत असताना त्याचे पडसाद तळातील ग्रामीण भागातही दिसत आहेत. राजापूर तालुक्यातील काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेतला आहे.
त्यांच्यासमवेत वाटुळचे उपसरपंच विक्रम धावडे, सदस्य कविता चव्हाण, नलिनी चव्हाण, अवनी धावडे, ग्रामस्थ रश्मी चव्हाण, नम्रता नारकर, संतोष बावकर, चंद्रकांत धावडे, बंटी पांचाळ, पिंट्या पांचाळ आदींसह शेकडो महिला, ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच चव्हाण यांनी सामंतबंधूचा विकासकामांसाठीचा पाठपुरावा चांगला असल्याचे सांगितले. मंत्री सामंत यांचे कौतुक केले. सरपंच चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद चांगलीच वाढली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेला फायदा होणार असल्याचा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.