विधानसभेच्या निवडणुका कधी होतील हे कुणालाही माहिती नाही; पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून चिपळुणात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी नुकतेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर अनेकांनी निवडणूक लढवण्यासाठीची प्राथमिक मशागत सुरू केली आहे. येथील बांदल हायस्कूलच्या सभागृहात शिवसेनेच्या निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. विधानसभेच्या तयारीच्यादृष्टीने सर्वाधिक मोठी बैठक ठरली. विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेचे जुने व नवे कार्यकर्ते एकदिलाने उपस्थित राहिले.
शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांची मते समजून घेतली. शिवसेना फुटल्यानंतर चिपळुणात कार्यकर्त्यांच्या अनेक बैठका झाल्या; मात्र राष्ट्रवादी’ फटल्यानंतर ही पहिलीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शेखर निकम कशा पद्धतीने मतदारसंघ बांधत आहेत त्याची माहिती दिली. आमदार निकमांची पद्धत शिवसेनेसाठी धोकादायक असल्याचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी सांगितले. आता आमदार भास्कर जाधवांच्या नेतृत्वाखाली चिपळुणात काम करू, असे त्यांनी सांगितले.
सचिन कदम चिपळूणमधून इच्छुक असल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरू होती. बैठकीत त्यांनी आपल्याला राजयोग नाही तो आमदार भास्कर जाधव यांना असल्याचे सांगून जाधवांना प्रमोट केले. जिल्हा उपाध्यक्ष प्रताप शिंदेंसह या तीन प्रमुख नेत्यांनी आपण विधानसभेच्या निवडणुकीत इच्छुक नाही, असे स्पष्ट केले. सर्वाधिक कार्यकर्त्यांची मते आमदार भास्कर जाधव यांच्या बाजूने दिसली. आमदार जाधव सध्या गुहागर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना त्यांचा मुलगा विक्रांत जाधव यालाही आमदार करायचे आहे. त्यामुळे आमदार जाधव यांचे चिपळूण आणि गुहागर दोन्ही मतदार संघावर लक्ष आहे.
पक्षाकडून त्यांना दोन्ही मतदार संघाची जबाबदारी मिळेल का? मिळाली तर भास्कर जाधव कुठून निवडणूक लढवतील? विक्रांतला कोणता मतदार संघ सोपा आहे? शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर राहतील का? जाधवांनी सभागृहात भाजपला नेहमीच अंगावर घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या पराभवासाठी भाजपसह किती लोक पुढे येतील ? त्यांची रणनिती काय असेल? याबाबत चर्चा सुरू आहे; मात्र शिवसेनेची बैठक संपताच काहींनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नुकताच वाढदिवस झाला. या निमित्ताने इच्छुकांकडून काही वस्तू वाटल्या जात आहेत. त्याशिवाय भविष्यकाळात मतदार संघात सभा, मेळावे घेण्याची तयारी सुरू झाली आहे.
उमेदवाराबाबत गुप्तता – आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात चिपळुणात कुणाला उमेदवारी मिळेल, हे सांगितले नाही; मात्र चिपळूणचा आमदार हा शिवसेनेचाच असेल. शिल्लक राहिलेली राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मुस्लिम समाजापर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्याचे आवाहन भास्कर जाधव यांनी केले. जाधवांना विश्वासात न घेता चिपळूणची निवडणूक जिंकणे शिवसेना आणि मित्र पक्षातील कोणत्याच नेत्याला शक्य नाही. त्यामुळे जाधवांना डावलून सुरू असलेल्या निवडणुकीच्या तयारीवर सर्वांचे बारकाईने लक्ष आहे.