अरबी समुद्रातील शिवरायांचे स्म ारक जेंव्हा होईल तेव्हा होईल मात्र रत्नागिरीत रत्नदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टी उभी राहिली आहे. ही शिवसृष्टी रत्नागिरीच्या सौंदर्यात भर घालत आहे. पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी निश्चितपणे आकर्षित होतील, असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरीत रत्नादुर्ग किल्ल्यावर देखणी शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा सोमवारी सायंकाळी पार पडला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत बोलत होते. ही शिवसृष्टी म्हणजे रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांसाठी नवे आकर्षणाचे ठिकाण ठरणार आहे. शिवसृष्टीचे काही काम अद्याप बाकी आहे. लवकरच ते पूर्ण करण्यात येईल.
अत्यंत देखणी अशी ही शिवसृष्टी उभारण्यात जेजे स्कूल ऑफ आर्टच्या कलाकार टीमचे मोठे योगदान आहे. या सर्वांचे मी या ठिकाणी कौतुक करतो. गेल्या काही महिन्यातं रत्नागिरीचे रुपडे बदलण्याचे अनेक निर्णय झाले. याचे परिणाम आता पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्यात आला आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर उभारलेला हा शिवछत्रपतींचा पहिला देखणा पुतळा आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिव शिवरायांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. ते जेव्हा होईल तेंव्हा होईल मात्र तत्पूर्वी आपल्याला रत्नागिरी रत्नदुर्ग किल्यावर शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारी शिवसृष्टी उभारता आली याचे निश्चितच समाधान आहे, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, माविमचे जिल्हा समन्वयक अमरिश मिस्त्री, तहसिलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित होते.