29.9 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

फुटबॉलचा सर्वात मोठा स्टार पुढच्या वर्षी भारतात येणार…

संपूर्ण जगाला फुटबॉलचे वेड लागले आहे. भारतातही...

गणपतीपुळे किनाऱ्यावरील ‘त्या’ भिंतींना धोका

तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे किनाऱ्यावरील मंदिर परिसराला जोडून...

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान चिपळूणमध्ये, एकूण किती टक्के मतदान.. जाणून घ्या

नागरिकांच्या उत्साहामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला...
HomeRatnagiriजिल्ह्यात ४ मतदारसंघामध्ये शिवसेना आमने-सामने, आज भवितव्य ठरणार

जिल्ह्यात ४ मतदारसंघामध्ये शिवसेना आमने-सामने, आज भवितव्य ठरणार

मुख्य मुकाबला सत्तारुढ महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होणार आहे.

जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडणार आहे. ५ जागांसाठी एकुण ३८ उमेदवार रिंगणात असून ४ मतदारसंघात शिवसेना आम ने-सामने आहे तर एका मतदारसंघात राष्ट्रवादीचे २ गट एकमेकांविरूद्ध लढत आहेत. पाचही लढती चुरशीच्या असून कोण बाजी मारणार याचे उत्तर शनिवारी २३ नोव्हेंबरला मिळेल. दरम्यान बुधवारी होत असलेल्या मतदानाची जय्यत तयारी प्रशासनाने केली असून बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष – महाराष्ट्रात अडिच वर्षापुर्वी राजकीय भुकंप झाला आणि शिवसेना फुटली. त्यानंतर वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आणि अजितदादा त्यांच्या समर्थकांसह सरकारमध्ये सामिल झाले. या अभुतपुर्व अंशा सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात दोन्ही शिवसेनांचे उमेदवार ४ मतदारसंघात रिंगणात असून चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादीचे २ पक्ष एकमेकांविरोधात मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडी आणि म हायुती यांच्यातील हा सामना चुरशीचा बनला आहे.

कदम विरूद्ध कदम – दापोली-मंडणगड – खेड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या विरोधात माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख संजय कदम यांच्यात लढत होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संतोष आबगुल यांना या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा बनला आहे.

जाधव विरूद्ध बेंडल – गुहागर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार भास्करशेठ जाधव यांचा सामना महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्याशी होत आहे. अतिशय चुरशीच्या अशा या सामन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रमोद गांधी यांना मैदानात उतरविल्याने लढत अधिकच औत्सुक्याची बनली आहे.

चिपळूणात दोन राष्ट्रवादी आमने-सामने – चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आंणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – भाजपा-शिवसेना (शिंदे गट)-आरपीआय (आठवले गट) या महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांचा ‘सामना महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्याशी होत आहे. ही लढत अतिशय चुरशीची असून कोण बाजी मारते याकडे लक्ष लागले आहे.

रत्नागिरीकडे साऱ्यांचे लक्ष – रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून जिल्ह्याचे पालकमंत्री ना उदय सामंत हे महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाला उतरवणार याचा फैसला बरेच दिवस होत नव्हता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या ४ दिवस आधी भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर झाली. या मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

राजापुरात साळवी विरूद्ध सामंत – राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात शिंदेंच्या सेनेचे उमेदवार प्रसिद्ध व्यावसायिक किरण तथा भैय्या सामंत हे लढत आहेत. भैय्या सामंत हे पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून कोण बाजी मारते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

३८ उमेदवार – रत्नागिरी जिल्ह्यातील ५ मतदारसंघांमध्ये ३८ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य मुकाबला सत्तारुढ महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होणार आहे. निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular