दादर येथील शिवाजी पार्कमधील महापौरांच्या जुन्या निवासस्थानी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या भूमिपूजन सोहळ्यासाठी विशेष परवानगी घेण्यात आलेली. त्यानुसार, बुधवारी म्हणजे 31 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा पार पडला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाच्या मंजुरीला चालना मिळाली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम दोन टप्प्यांमध्ये केले जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यामध्ये इमारतीच्या अंतर्गत, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, स्थापत्यकला आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, सुशोभिकरण म्हणून बाग तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामांवर भर दिला गेलेला आहे. यासाठी 250 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तर बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारक दुसऱ्या टप्प्यामध्ये तांत्रिक कामाकडे लक्ष पुरविण्यात आले आहे. त्यामध्ये तंत्रज्ञानविषयक कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये लेझर शो कथा, गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्यूअल रियालिटी शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन आणि तांत्रिक बाबींवर काम करण्यावर भर दिला जाईल. यासाठी राज्य सरकारकडून 150 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात येणार आहे.
हिंदुहृदयसम्राट तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी प्रत्येकाच्या मनात पेटवलेली अस्मितेची मशाळ. शिवसेना पक्षाची केलेली स्थापना, बाळासाहेबांची दमदार आवाजातील स्पष्टव्यक्ती भाषणे, त्याच्याच जोडीला सुबक अशी संदर्भित व्यंगचित्रे, शिवसेनेच्या पहिल्या नगरसेवकापासून ते सेनेच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत शिवसेनेची सुरु झालेली वाटचाल असा जीवनपट दाखवणारे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जुन्या महापौर निवासस्थानाच्या तीन एकर जागेत आकार घेत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या अस्तित्वाची कायम जागृती दर्शविणाऱ्या या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डीजीटली करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दादरमधील शिवाजीपार्क येथील शिवतीर्थाच्या अगदी समोरील जुन्या महापौरांच्या निवासस्थानाच्या जागेमध्ये 68 हजार चौरस फुटांत स्मारकाचे आकर्षक आगमनद्वार, ग्रंथालय, तसेच डिजिटल लायब्ररी अशा सुविधांच्या विविध वास्तूंसह उभ्या राहणाऱया या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन मंत्रोच्चाराच्या घोषात ड्रिलिंग मशीनची कळ दाबून करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळ प्रेस करताच या मशीनचे कामकाजाला प्रारंभ झाला तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणांनी सर्व परिसर दणाणून सोडला. शिवसेनाप्रमुखांना प्रिय फुलांपैकी एक असणाऱया सोनचाफ्याच्या झाडाचे वृक्षारोपण महापौर निवासस्थानाच्या समोरील बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या हस्ते केले गेले. यावेळी राष्ट्रीय स्मारकाच्या प्रकल्पाचे सादरीकरण दाखविण्यात आले.