सियावर रामचंद्र की जय’ या नाऱ्याने बुधवारी अवघी रत्नागिरी दुमदुमली. निमित्त होते येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे अतिशय थाटामाटात आणि भक्तीभावाने हा सोहळा बुधवारी पारंपारिक पद्धतीने साजरा झाला. दिवसभर दर्शनासाठी रामभक्तांची रिघ मंदिरात लागली होती. दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी रामजन्मोत्सव होताच भक्तांनी आनंद साजरा केला. पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी वाजतगाजत भव्यदिव्य अशी रामरायाची सवारी शहरातून निघाली.
शेकडो रामभक्त मोठ्या उत्साहात या शोभायात्रेत सहभागी झाले होते. जय श्रीराम आणि सियावर रामचंद्र की जय या नाऱ्याने सारे वातावरण राममय झाले होते. बुधवारी सकाळपासूनच रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. स. ६ वा. नगारा व चौघडा वादन झाले. त्यानंतर स. ६ ते ७ कालावधीत षोडषोपचार पूजा व छप्पन भोग मिठाईचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर भजनांना सुरुवात झाली. दर्शनासाठी भाविकांची रिघ वाढतच होती. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते.