मुंबईसह कोकणच्या काही भागांना सोमवारी वरुणराजाने अक्षरशः झोडपून काढले. रविवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने रेल्वे सेवा ठप्प झाली होती तसेच रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली. राजधानीत अनेक भागांमध्ये सहा तासात ३०० मिलिमीटर पाऊस कोसळला. वेधशाळेने आणखी पावसाचा इशारा दिल्याने सोमवारी (ता. ८) प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. सखल भागात पाणी साचल्याने मुंबई जलमय झाली होती. कोकणामध्येही जोरदार पाऊस कोसळू लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली असून पंचगंगेची जलपातळी स्थिर आहे.
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू लागला असून जगबुडी, अर्जुना, काजळी नद्या इशारा पातळीवर वाहू लागल्याने पूरस्थिती गंभीर झाली आहे. सिंधुदुर्गात मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. मराठवाडा, विदर्भालां आणि उत्तर महाराष्ट्राला मात्र अद्याप जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. मुंबईतील अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागात जात परिस्थितीचा आढावा घेतला तसेच यंत्रणांना सावध राहण्याचे आदेश दिले.
संपूर्ण जून आणि जुलै महिन्याचा पहिला आठवडा कोरडाच गेल्यामुळे मुंबईकरांना जोरदार पावसाची प्रतिक्षा होती. रविवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत सहा तासांत ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे सोमवारी सकाळी प्रवाशांची दाणादाण उडाली.
समुद्रकिनाऱ्यांवर कडेकोट बंदोबस्त – सोमवारी दुपारी १.५७ वाजण्याच्या दरम्यान समुद्रात ४.४० मीटर उंचीची भरती आली होती. याचवेळी मुसळधार पाऊस कोसळला असता तर शहरात पाणी भरण्याची शक्यता होती. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला केला होता. गेटवे ऑफ इंडिया येथे आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी समुद्रापासून लांब केले.
पन्नासहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द – मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. पावसामुळे सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतूक विस्कळित झाली. यामुळे २७ उड्डाणे वळवण्यात आली आणि पन्नासहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.