28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

पेठमाप-मुरादपूर पुलाचे काम पुन्हा जोमाने सुरु…

चिपळूण शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतुकीवर उत्तम...

ना. उदय सामंतांचा रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केला अभूतपूर्व सत्कार

रत्नागिरीचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय...
HomeChiplunचौपदरीकरणावरील सावलीसाठी आंदोलन, वृक्ष लागवड समिती आक्रमक

चौपदरीकरणावरील सावलीसाठी आंदोलन, वृक्ष लागवड समिती आक्रमक

गतवर्षी दीड-दोन फुटांची लावलेली झाडे मेली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात हजारो झाडांची कत्तल झाली. त्या तुलनेत नव्याने झाडांची लागवड झालेली नाही. महामार्गाशेजारी गतवर्षी जी झाडे लावली ती मृत पावली आहेत. या लागवडीबाबत सातत्याने पाठपुरावा केला असता अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे महामार्गालगत नियमानुसार देशी जातीची झाडे लावावीत, या मागणीसाठी येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर हायवे वृक्ष लागवड हक्क समिती सोमवारी (ता. १०) सकाळी १० वा. आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे समितीने पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या सात-आठ वर्षांपासून मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

हे काम मार्गी लागत असतानाच इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार झाडे लावण्याची सूचना महामार्गाच्या ठेकेदारास देण्यात आली. त्यानुसार गतवर्षी झाडे लावण्यास सुरुवात झाली; मात्र देशी जातीची झाडे न लावता विदेशी रोपे लावल्याचा आक्षेप हायवे वृक्ष लागवड हक्क समितीने घेतला. या समितीचे सतीश कदम, बापू काणे, अशोक भुस्कुटे, अजय भालेकर, किशोर रेडीज, शहानवाज शाह म्हणाले, आम्ही गेली पाच वर्षे वृक्ष लागवडीबाबत महामार्ग विभागाकडे पाठपुरावा करत आहोत. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नियमानुसार दीड ते दोन मीटर उंचीची झाडे लावायची आहेत; मात्र गतवर्षी दीड-दोन फुटांची लावलेली झाडे मेली. खोल खड्डा खोदून त्यात सेंद्रिय खत टाकावयाचे आहे.

तसेच लागवड केलेल्या झाडास ट्री गार्ड लावणे बंधनकारक आहे; मात्र महामार्गावर कुठेही एका झाडालाही ट्री गार्ड लावलेले नाही. गुहागर-विजापूर मार्गावरही तीच अवस्था आहे. येथील ठेकेदाराने जंगलातीलच विदेशी आकेशियाची रोपे आणून ती लावली. त्यास ट्री गार्ड म्हणून हिरवे नेटचे कापड गुंडाळले आहे. या झाडांना उन्हाळ्यात पाणी न दिल्याने हजारो झाडे मृत पावली आहेत. जिथे जागा उपलब्ध आहे तिथे झाडे लावायची आहेत; मात्र केवळ एका रांगेत झाडे लावून वृक्ष लागवडीचे सोपस्कार पार पाडले जात आहेत. झाडे न लावल्यामुळे १७ कोटीचा निधी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून वनविभागाकडे वर्ग केल्याचे अधिकारी सांगतात; परंतु वनविभागाने निधी मिळाल्याचे स्पष्ट केलेले नाही.

ठेकेदार दाद देत नसल्याने राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी जबाबदारी टाळत आहेत. राजकीय नेते, अधिकारी आणि ठेकेदाराची भ्रष्ट युती झाली आहे. त्यामुळे महामार्ग उजाड पडला असून, तेथे वृक्षलागवड झालेली नाही. या प्रकारास संयमाने वागणारे नागरिकही जबाबदार आहेत. उन्हाचे चटके कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हायला हवी. महामार्गावरून ‘प्रवास करताना लोकांना सावली मिळाली पाहिजे; अन्यथा आगामी काळात त्याचे भयानक परिणाम सोसावे लागतील, असा इशारा बापू काणे यांनी दिला. १० जूनला आत्मक्लेश आंदोलनात चिपळूण शहरासह तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular