प्रत्येक सामन्यास उपलब्ध राहील, असा खेळाडू कर्णधार म्हणून असायला हवा. हार्दिक पंड्याबाबत तंदुरुस्तीचा प्रश्न कायम आहे, म्हणून श्रीलंकेतील द्वेन्टी-२० मालिकेसाठी आम्ही सूर्यकुमारकडे नेतृत्व दिले, असे भूमिका निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मांडले. द्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील विजेत्या संघाचे उपकर्णधारपद हार्दिक पंड्याकडे होते. रोहित शर्मा या प्रकारातून निवृत्त झाल्यानंतर हार्दिकची कर्णधारपदी निवड होईल, असा सर्वांचा अंदाज होता; परंतु निवड समितीने सूर्यकुमारला पसंती दिली. सूर्यकुमार टी-२० मधील महत्त्वाचा खेळाडू आहे.
ड्रेसिंग रूममधूनही आम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेतली. त्याच्याकडे चांगली विचारशक्ती आहे. तो टी-२० प्रकारात क्रिकेट विश्वात सर्वोत्तम फलंदाज आहे. परिणामी, आम्ही त्याला पसंती दिली, सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असेल, असा खेळाडू कर्णधार असणे संघाच्या हिताचे असते, असे आगरकर म्हणाले. हार्दिक पंड्याही संघासाठी हुकमी खेळाडू आहे, त्याचा पर्यायी खेळाडू मिळणे कठीण आहे; परंतु त्याच्यासमोर तंदुरुस्तीची अडचण आहे. गेल्या काही वर्षात तो तंदुरुस्त नसल्यामुळे काही सामन्यांस मुकलेला आहे, असे हार्दिकबाबत बोलताना आगरकर यांनी निवड समितीची भूमिका स्पष्ट केली.
जडेजाला वगळले नाही – श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी जडेजाची निवड केली नाही, म्हणजे आम्ही त्याला वगळले असा अर्थ होत नाही. या मालिकेत जडेजा किंवा अक्षर पटेल एकच खेळाडू अंतिम सामन्यात खेळेल, त्यामुळे दुसऱ्याला बाहेर बसावे लागणार आहे. तसेच, येत्या काही महिन्यात १० कसोटी सामने खेळायचे आहेत. तेव्हा जडेजा महत्त्वाचा खेळाडू असणार आहे, असे स्पष्टीकरण आगरकर यांनी दिले.
महत्त्वाचे मुद्दे – शुभमन गिल तिन्ही प्रकारातील खेळाडू, तंदुरुस्तीच्या अडचणीमुळे हार्दिकने कर्णधारपद गमावले, मोहम्मद शमी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची शक्यता, अभिषेक नायर, रायन टेन डेस्काटे सहायक प्रशिक्षक, मुंबईचे साईराज बहुतुले गोलंदाजीचे हंगामी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून टी. दिलीप कायम