रत्नागिरी शहरातील माळनाका ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयादरम्यान ‘हिट अँड रन’चा थरार घडला. लांजातील एका डॉक्टरची मोटार घेऊन आलेल्या तरुणाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव मोटार दोन वाहनांना ठोकर देत रस्त्याच्या बाजूच्या खांबावर आदळली. अपघातानंतर स्थानिकांनी चालकासह अन्य सहकाऱ्याला चोप दिला. काल रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला; मात्र शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. भरधाव गाडी चालवत इतर वाहनांना ठोकर देऊन केलेल्या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. काही क्षणात घटनास्थळी मोठ्या संख्येने स्थानिक गोळा झाले.
अपघातानंतर चालकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात लोक घेऊन गेले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये त्यांनी मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट झाले. मोटारीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघातग्रस्त मोटार लांजातील एका डॉक्टरची असल्याचे पोलिसांनी सांगितले. लांजातील डॉक्टरांची ही मोटार त्यांचा मित्र असलेल्या दुसऱ्या डॉक्टरला कामानिमित्त दिली होती. ते रत्नागिरीत घेऊन आले होते; परंतु काल रात्री मोटारीचा अपघात केला. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याबाबत संबंधित डॉक्टराकडून हे प्रकरण मिटवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली नव्हती.