24.6 C
Ratnagiri
Sunday, November 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriलांजा शहरात वहाळात तुंबलेले पाणी घरात शिरले

लांजा शहरात वहाळात तुंबलेले पाणी घरात शिरले

महामार्गावर असलेल्या श्रीराम पुलाजवळी वहाळ शनिवारी पहाटे तुंबला.

शुक्रवारी रात्री संपूर्ण रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे लांजा शहरातील मुंबई गोवा महामार्गावरील श्रीराम पुलाजवळील वहाळ तुंबल्याने पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आसपासच्या भागातील अनेक घरांत पाणी शिरले. रात्रीची वेळ होती असल्याने काय करायचे या एकाच विचाराने नागरिकांची जोरदार तारांबळ उडाली. अशातच महामार्ग ठेकेदार कंपनीचे अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याने नागरिकांच्या संतापाचा चांगलाच पारा चढला. महामार्ग ठेकेदार कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणाबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गेले चार दिवस लांजा तालुक्यात सरीवर पाऊस पडत होता, मात्र शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्या पासून शनिवारी १ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत पावसाने अक्षरशः धुडगूस घातला. या पावसामुळे लांजा शहरातील महामार्गावर असलेल्या श्रीराम पुलाजवळी वहाळ शनिवारी पहाटे तुंबला. त्यामुळे सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आसपासच्या परिसरात असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले. या वहाळावर पुलानजीक पर्यायी मार्ग काढण्यात आल्याने याठिकाणी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. या मातीच्या भरावामुळे या वहाळातील पाणी तुंबले गेले. पावसाचा जोर वाढल्यानंतर वास्तविक मोकळा करणे आवश्यक होते. मात्र तसे न करता महामार्ग ठेकेदार कंपनीचे अधिकारी घरात झोपून राहिले असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

केवळ या संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांम ळेच आज येथील नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. वहाळातील पुराचे पाणी नजीकच्या घरांमध्ये शिरल्याने घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहने पाण्यात गेल्याने संबंधित नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः गेल्या सहा महिन्यातील याच परिसरातील ही चौथी घटना आहे. तरी देखील ठेकेदार कंपनीने यासंदर्भात वेळोवेळी निष्काळजीपणा दाखविला असल्याचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे. अशाही परिस्थितीत पहाटेच्या वेळी नागरिकांनी मदतीसाठी ठेकेदार कंपनीशी संपर्क साधला, मात्र बराच वेळ कंपनीतील जबाबदार व्यक्तींनी फोन उचलण्यास टाळाटाळ केल्याचे नागरिकांमधून सांगण्यात आले. शेवटी ठेकेदार कंपनीकडून तातडीने मदत म्हणून जेसीबी मशीन पाठविण्यात आले. परंतु तोपर्यंत स्थानिक नागरिक आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी लोकांच्या मदतीसाठी धावून आले होते. काहीनी स्वतःच्या मालकीचे जेसीबी मशीन आणून वहाळ फोडण्याचे प्रयत्न केले. वहाळ फोडल्यानंतर तब्बल चार तासांनंतर सकाळी ९.३० वाजण्याच्या सुम ारास पाणी. ओसरू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

याचदरम्यान महामार्ग ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी घटनास्थळी आले असता संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना याबाबत जाब विचारला. यावेळी आमदार किरण सामंत यांनी संतप्त नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत ठेकेदार कंपनीला झालेल्या नुकसानीची पाहणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, पहाटेच्यावेळी नागरिकांवर ओढवलेल्या या संकटकाळी ठेकेदार कंपनीचे अधिकारी मात्र गाढ झोपेत होते. श्रीराम पुलाजवळील परिसरातील नागरिकांनी त्यांना अनेकवेळा फोन केले तरी त्यांनी फोन उचलले नाही. त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून बेजबाबदारीने वागणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची नुकसानग्रस्त नागरिकांकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular