शाळांच्या उन्हाळी सुट्टीचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मागील शैक्षणिक वर्षामध्ये शाळेचे कामकाज हे ऑनलाईनच असल्याने विद्यार्थ्यांना अधिकच सराव मिळावा आणि शिक्षकांचे देखील शिकवण्याचे तास भरावे यासाठी शाळा परीक्षा झाल्यानंतर देखील एप्रिल अखेरपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पण शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, या कल्पनेनं नाराज झालेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना अखेर उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळांना २ मे ते १२ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष १३ जून पासून सुरु होणार आहे. केवळ विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता २७ जून पासून सुरु होणार आहे.
सध्या वातावरणामध्ये उष्मा अधिक प्रमाणात वाढल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याने त्रास संभवू शकतो. यासाठी उन्हाळी सुट्टीच्या कालावधी बद्दल अनेक चर्चा सुरु होत्या. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या कारणाने देखील उन्हाळ्याची मोठी सुट्टी काही सणांमध्ये मर्ज करण्यात यावी याबाबत सुद्धा मतांतर सुरु आहे.
उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी कमी करुन या सुट्ट्या गणेशोत्सव, दिवाळी किंवा नाताळ सारख्या सणांच्या वेळेस वापरता येणार आहेत. या सुट्ट्या देण्याचा अधिकार स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांना असणार आहेत. मात्र या सुट्टया देताना त्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. हे आदेश प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी दिले आहेत.