19.9 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeRatnagiriराज्यातील पहिल्या बीच कुस्तीचे, रत्नागिरी मांडवी बीचवर आयोजन

राज्यातील पहिल्या बीच कुस्तीचे, रत्नागिरी मांडवी बीचवर आयोजन

येत्या २२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता महिला आणि पुरुष विभागात एकूण १० गटांत हा आगळा वेगळा कुस्ती स्पर्धा प्रकार होणार आहे.

रत्नागिरीतील मांडवी बीचवर राज्यामध्ये पहिल्यांदाच बीचवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या २२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता महिला आणि पुरुष विभागात एकूण १० गटांत हा आगळा वेगळा कुस्ती स्पर्धा प्रकार होणार आहे. रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे कार्यवाह सदानंद जोशी यांनी याची माहिती दिली आहे.

माती, गादीवरील कुस्ती स्पर्धेबरोबर आता बीच कुस्ती स्पर्धा हा नवीन कुस्ती प्रकार समाविष्ट झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात प्रथमच मांडवी येथील जय भैरव नवरात्रोत्सव मंडळ, मांडवी पर्यटन संस्था आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मांडवी येथील जोंधळ्या मारुती मंदिर परिसरात बीचवरील कुस्ती स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यातील युवा कुस्तीपटूंना जास्तीत जास्त संधी मिळावी, कुस्तीची परंपरा जिल्ह्यात रुजावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  प्रत्येक गटातील विजेता आणि उपविजेता यांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धकांना प्रवास भत्ता, जेवणाची सोय आदी व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे. या नाविन्यपूर्ण स्पर्धेला रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धक व प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील, अशी आयोजकांना अपेक्षा आहे. यावेळी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण ऊर्फ भाई विलणकर, मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, कुस्ती असोसिएशनचे सदस्य आनंद तापेकर उपस्थित होते.

जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने १२ मे ते २१ मे दरम्यान छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर कुस्तीचे मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. कुस्तीतील सराव, नवीन तंत्र शिकता यावे, अंतर्गत कला कौशल्य यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील होतकरू आणि युवा कुस्तीपटूंनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान, स्पर्धेच्या अनुषंगाने २१ मे रोजी सकाळी ७ ते ८ या दरम्यान मांडवी बीचवर स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular