रत्नागिरीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या आंबा घाटात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला. गायतोंड स्थानाच्या वरच्या बाजूस खोल दरीत हा मृतदेह फेकून देण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार तरुणाचे वय अंदाजे २५ वर्षे आहे. अन्य ठिकाणी त्याची हत्या करून दरीत फेकण्यात आला असावा, असा पोलिसांनी कयास बांधला आहे.
मृतदेहाच्या आजूबाजूला या तरूणाच्या पायातील बूट आणि गॉगल या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू सापडल्या नाहीत. रत्नागिरी-देवरूख पोलीस तपास करत आहेत. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा चार जिल्ह्यांतील बेपत्ता नागरिकांची माहिती वेगाने गोळा करण्यात येत आहे. या तरूणाची ओळख अद्यापही पटलेली नव्हती. त्यामुळे नक्की या हत्येमागील गूढ काय आहे हे उकलण्याचे तगडे आव्हान पोलिसांसमोर आहे.
त्यानंतर काल आंबा घाटात सापडलेला मृतदेह हा कोल्हापूर मधील एका तरुणाचा असून, तो घरातून २५ दिवसांपासून बेपत्ता होता. या मृतदेहाबाबत बरेच तर्क वितर्क लढविले जात होते. आता या तरुणाचा त्याच्या मित्रांनीच निघृण खून केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
महादेव उर्फ दादासो किसन निगडे वय ३० असे मृताचे नाव आहे. आंबा घाटात सदर खून करून टाकल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संशयित म्हणून सूरज मेहबुब चिकोडे वय २५, गणेश राजेंद्र शिवारे वय ३०, प्रतीक बापुसो कोळी वय १७ या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महादेव निगडे हा १६ एप्रिल रोजी देव दर्शनासाठी घरातून गेला होता. परंतु तो बरेच दिवस परत न आल्याने त्याच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मयत महादेव निगडेची त्याच्या कपड्यावरून ओळख पटली असून, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड यावरुन देवरूख पोलिसांनी तपास गतिमान करत खुनाचा उलगडा केला आहे