26.4 C
Ratnagiri
Friday, November 1, 2024

महाराष्ट्रात शेतकरी दाखला कसा काढायचा | How to get Farmer’s Certificate in Maharashtra

महाराष्ट्रात सरकारी नियमा नुसार शेतीतल्या जमिनीसाठी करामध्ये...
HomeDapoliदापोलीत निवडणूक कर्मचाऱ्यांचे जेवणाविना हाल

दापोलीत निवडणूक कर्मचाऱ्यांचे जेवणाविना हाल

अनेक कर्मचाऱ्यांनी पदरच्या पैशाने बिस्कीट खाऊन आपली भूक भागवली.

ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन ताब्यात घेण्यासाठी दापोलीतील स्ट्रॉगरूममध्ये दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना उशिरापर्यंत दुपारचे जेवण मिळाले नाही. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात रायगड लोकसभेची निवडणूक पार पाडण्यासाठी आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे हाल झाले. अनेक कर्मचाऱ्यांनी पदरच्या पैशाने बिस्कीट खाऊन आपली भूक भागवली. रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणूक पार पाडण्यासाठी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील शासकीय कर्मचाऱ्यांना दापोली विधानसभा मतदारसंघात नेमण्यात आले आहे. मंगळवारी (ता. ७) दापोली मतदारसंघातील ३५१ केंद्रांवर लोकसभेची निवडणूक होणार आहे.

दापोलीचे स्ट्राँगरूम कोकण कृषी विद्यापिठात केले आहे. आज पहाटेपासून रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी येथे दाखल झाले. ते ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट घेऊन मतदान केंद्रावर जाणार आहेत. तब्बल दोन हजाराहून अधिक शासकीय कर्मचारी आज सकाळी स्ट्राँगरूमच्या परिसरात जमा झाले. त्यांना सकाळी चहा-नाष्टा देण्यात आला. त्याचा दर्जा चांगला नव्हता तसेच नियोजन बरोबर नव्हते, अशी कर्मचाऱ्यांची तक्रार होती. निवडणुकीसाठी ज्या कर्मचाऱ्यांना नेमले आहे त्यांचे काही दिवसापूर्वी प्रशिक्षण घेण्यात आले.

त्या वेळी कर्मचाऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी केली होती. तरीही आज कर्मचाऱ्यांना दुपारचे जेवण मिळण्यास उशिर झाला. अनेक शासकीय कर्मचारी एसटीमध्ये बसून – होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान जेवण सुरू झाले आणि काही वेळातच ते संपले. त्यामुळे पन्नास टक्केहून अधिक लोक उपाशी राहिले. काही कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट ताब्यात मिळाल्यानंतर ते न जेवता एसटीने मतदान केंद्राकडे रवाना झाले. काहींना जेवणासाठी वाट बघावी लागली.

निवडणुकीच्या कामासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक झाल्यानंतर ज्यांना बीपी आणि शूगरचा त्रास आहे त्यांनी आम्हाला निवडणुकीच्या कामातून सुटका मिळावी, अशी मागणी केली होती; मात्र निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी गंभीर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक रद्द केली; मात्र बीपी आणि शूगरचा त्रास असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक कायम ठेवली. अशा कर्मचाऱ्यांना आज दुपारी वेळेवर जेवण मिळाले नाही. त्यामुळे शूगर वाढण्याच्या भितीने या कर्मचाऱ्यांनी चक्क दुपारी बिस्कीट खाऊन दिवस काढले. या संदर्भात तक्रार केली तर शिस्तभंगाची कारवाई होईल म्हणून कोणी या गैरसोयीबद्दल उघडपणे बोलण्यास तयार नव्हता.

RELATED ARTICLES

Most Popular