ज्येष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशन चे मकरंद अनासपुरे यांनी चिपळुणातील पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले कि, वृक्षारोपण बरोबरच झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली पाहिजे. तरच पर्यावरणपूरक कार्यक्रम यशस्वी होतील.
चिपळूण नगरपरिषद, नाम फाउंडेशन व श्रमिक पत्रकार संघ चिपळूणतर्फे लवेकर बाग जवळ शिवनदी किनारी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी नाम फाउंडेशनचे मल्हार दादा पाटेकर, समीर जानवलकर, चिपळूण बचाव समितीचे बापू काणे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. प्रसाद शिंगटे, पत्रकार मकरंद भागवत संतोष सावर्डेकर, राजेंद्र शिंदे, समीर जाधव, महेंद्र कासेकर, सुशांत कांबळे, नागेश पाटील, निलेश डिंगणकर तसेच पोलीस व चिपळूण नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले की, वृक्षारोपण कार्यक्रम आवडला. याबद्दल चिपळूण नगर परिषदेचे अभिनंदन! विशेष म्हणजे झाडे मोठी आणले आहेत. काही वेळा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे इव्हेंट होतात. झाडांची काळजी घेतली जात नाही. तरी भविष्यात वृक्षारोपण बरोबरच संगोपन होणे हे महत्त्वाचे आहे. तसेच ज्यांची शेती आहे. त्यांच्या शेतीमध्ये वृक्षारोपण झाले आहे. ते शेतकरी स्वतःहून उपस्थित राहिले आहेत. विशेष म्हणजे या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. दुसरे म्हणजे झाडांची निवड योग्य आहे. देशी- पर्यावरणपूरक झाडे आहेत. जांभूळ, पिंपळ, पेरू, बकुळ अशी देशी झाडे आहेत.
तर या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी पुढील पिढीवर असणार आहे. यामध्ये चिपळुणातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिक्षकांना विनंती असेल की, पहिली ते दहावीतील विद्यार्थी शाळेत १० वर्षे असतात. तर महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी ३ ते ५ वर्ष महाविद्यालयात असतात. या सर्वांवर प्रत्येक झाडाच्या संगोपनाची जबाबदारी दिली पाहिजे. हीच भविष्यात उपलब्धी ठरेल. हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवला गेला. तर एक मोठे पर्यावरण पूरक काम होईल, असे मत ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी यावेळी व्यक्त केले.