रायगड मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी सुतारवाडी येथे पत्रकारांशी बोलताना येथील पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल आणि येथील अर्थव्यवस्था सुधारेल. या कामांसाठी पहिल्या टप्प्यातील अडीच कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती दिली. या पत्रकार परिषदेवेळी आमदार अनिकेत तटकरे, रत्नागिरी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे युवक सरचिटणीस विकास जाधव, दापोलीचे माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश संदीप राजपुरे, ओबीसी सेलचे सचिव प्रकाश शिगवण उपस्थित होते.
दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यात पर्यटन विकास निधींतून खासदार सुनील तटकरे यांनी एकूण ७ कामे मंजूर केली आहेत. या कामांसाठी ८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. दापोली आणि मंडणगड तालुक्यांमध्ये निसर्गाची मुक्त हस्ते उधळण केलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. सध्या उन्हाळी सुट्ट्या देखील सुरु झाल्याने, पर्यटन व्यवसायासाठी सुगीचे दिवस येणार आहेत. या दोन्ही तालुक्यांना ऐतिहासिक वारसा लाभल्याने पर्यटक गड, किल्ले , समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तूंच्या भेटीसाठी वारंवार येत असतात. त्यामुळे स्थानिकांना देखील उत्पन्नाचे साधन निर्माण होते.
ऐतिहासिक व पर्यटन स्थळांचे प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गतचे केळशी येथील याकुब बाबा दर्गा परिसर सुशोभिकरण, केळशी येथील महालक्ष्मी मंदिर, दाभोळ येथील शिवकालीन गुहेतील चंडिकादेवी मंदिर, मुरुड येथील दुर्गादेवी मंदिर, वेळास-मंडणगड येथील नाना फडणवीस यांचे स्मारक, आसूद येथील केशवराज मंदिर, आंजर्ले येथील कड्यावरील गणपती मंदिर दुरुस्ती व सुशोभिकरण करणे आदी कामे सुनील तटकरे यांनी मार्गी लावली आहेत.