राजापूरला ऐतिहासिक परंपरा लाभलेली असून, आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए- मिलाद यांसह अन्य सण, उत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहात आणि शांततेमध्ये साजरे करावेत. या काळामध्ये शांतता आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची साऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक धनंजय कुळकर्णी यांनी केले. सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंचायत समितीच्या किसानभवन सभागृहामध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीला अधीक्षक कुळकर्णी यांच्यासह प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, गटविकास अधिकारी विवेक गुंड, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या वेळी अधीक्षक कुळकर्णी यांनी रिक्षा व्यावसायिकांनी प्रवाशांकडून अव्वाच्यासव्वा भाडे आकारणी करू नये, एसटी प्रशासनाने सोल्ये येथील कोकण रेल्वे स्टेशनवर थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेनुसार एसटी गाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन करावे, अशी सूचना केली तर, वीजवितरण विभागासह अन्य विभागांना सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. तत्पूर्वी, प्रांताधिकारी श्रीमती माने, तहसीलदार जाधव यांनी सर्वांना आगामी सण शांततेमध्ये साजरे करण्याचे आवाहन करताना प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
या वेळी महावितरणचे ओंकार डांगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंतनू दुधाडे, नगर पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी आपापल्या विभागाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देत सविस्तर माहिती दिली. या वेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांसह सामाजिक संघटना, गणेशोत्सव मंडळ, सरपंच, पोलिसपाटील, तंटामुक्त समिती पदाधिकारी आदी उपस्थित होते.