खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागाला जोडणाऱ्या देवणे परिसरातील नदीपात्रात मंगळवारी दुपारनंतर एका पोत्यांत संशयास्पद वस्तू असल्याचे स्थानिक तरुणांना आढळून आले. स्थानिक तरुणांना हे पोते दिसताच त्यांनी तत्काळ खेड पोलिसांना याची माहिती दिली. सुरुवातीला या पोत्यात गोवंश असल्याची चर्चा परिसरात पसरल्याने काही काळ तणाव देखील निर्माण झाला. मात्र प्रत्यक्षात नेमके काय आहे हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून हे पोते आपल्या ताब्यात घेतले. यानंतर खेड पोलिसांनी हे पोते घेऊन थेट शहरातील पशुवैद्यकीय दवाखाना गाठत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोणी उघडण्यांत आली, यावेळी त्यामध्ये त्यांना म्हशीचे रेडकू मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासणीनंतर खेड पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या मृत जनावराचे नमुने तपासणीसाठी आपल्या ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावरही या घटनेबाबत विविध अफवा पसरू लागल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले. खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. अहिरे यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. देवणे परिसरात सापडलेल्या पोत्याम ध्ये गोवंश नसून म्हशीचे रेडकू मृत अवस्थेत आढळले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन खेड ते पोलीस निरीक्षक अहिरे यांनी केले. या घटनेम ळे काही काळ खेड शहरात वातावरण तणावपूर्ण बनले होते मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस आणि पशुवैद्यकीय विभाग मिळून या प्रकरणाचा सखोल तपास करत असून,. मृत रेडकू नदीपात्रात कसे आले याचा शोध आता खेड पोलीस घेत आहेत.

 
                                    