नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारी सायंकाळी ५ वा. आझाद मैदानावर होणार असल्याचे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले आहे. त्याची जय्यत तयारी देखील महायुतीच्यावतीने सुरू झाली असली तरी यावेळी कोणकोण शपथ घेणार या विषयी अजूनही संभ्रम आहे. हाती आलेल्या ताज्या बातमीनुसार ५ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तिघेजणच शपथ घेतील. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. मात्र याबाबत देखील अद्यापी अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात न आल्याने राजकीय अटकळींचा बाजार गरम आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागला. महायुतीला २३६ जागा मिळाल्या. इतके मोठे बहुमत मिळूनही नवे सरकार अजून स्थापन झालेले नाही.
महायुतीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपचा विधीमंडळ पक्षाचा नेता देखील ठरलेला नाही. राज्यपालांकडे महायुतीने सत्ता स्थापन करण्याबाबत दावा केलेला नाही. नियमानुसार मुख्यमंत्र्यांची राज्यपाल नियुक्ती करत असतात आणि त्यानंतर शपथग्रहण समारंभ होतो. त्यातील काहीही झालेले नसताना ४ दिवसांपूर्वी अचानक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मिडियावर एक ट्विट करुन ५ डिसेंबरला सायं. ५ वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नव्या सरकारचा शपथविधी होईल असें जाहीर केले.
सत्तेसाठी रस्सीखेच – आझाद मैदानावर तयारीदेखील सुरू झाली आहे. मात्र तीन पक्षांमध्ये अजूनही सत्तेच्या वाटपाबाबत बोलणी सुरू आहेत. मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. तीनही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांच्या याद्या सुत्रांकडून मिडियापर्यंत पोहोचत आहेत. मुख्यमंत्री भाजपचा असेल हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे अजितदादा पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री होतील, हे देखील निश्चित मानले जात आहे. मात्र शिवसेनेचा उपमुख्यमंत्री कोण? याचा पेच अजूनही कामय आहे. हे पद एकनाथ शिंदेंनी स्वीकारावे यासाठी भाजप आग्रही आहे. मात्र शिंदे तयार नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे शिवसेनेकडून नवे कोणते नाव पुढे येते याविषयी राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चाना पेव फुटले आहे.
तिघांचा शपथविधी? – हा सारा गोंधळात गोंधळ सुरू असतानाच आता ५ तारखेला सायं. ५वा. महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीनच नेते शपथ घेतील, अशी माहिती हाती येते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार आहे. मात्र त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ते जेमतेम १५ मिनिटच या सोहळ्याला हजेरी लावतील असे कळते. त्यामुळे केवळ तिघांचा शपथविधी मोदींच्या उपस्थितीत होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
अनेकांना निमंत्रण – दरम्यान गुरुवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण अनेकांना पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध संत, महंत, उद्योगपती, राजकीय पक्षांचे नेते, समाजसेवक आदी अनेकांना निमंत्रणे गेली आहेत. विरोधीपक्षांना निमंत्रण पाठविण्यात आले असल्याचे कळते. मात्र विरोधीपक्षाचे नेते शपथविधीला उपस्थित राहतात का? याकडे लक्ष लागले आहे.