जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. हे वातावरण तुडतुडा, बुरशीजन्य रोग, करपा आणि शेंडा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वेगाने होण्यास पोषक आहे. काही ठिकाणी तुडतुडा मोठ्या प्रमाणात पसरू लागला आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच औषध फवारणीचा खर्च बागायतदारांना करावा लागणार आहे. बदलत्या वातावरणामुळे हापूसचा हंगाम दीड महिने लांबला असून, अधिक उत्पन्न देणाऱ्या पहिल्या टप्प्यात बागायतदारांची मोठी निराशा होणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहोर येण्याची प्रक्रिया सर्वत्र सुरू होते; मात्र जिल्ह्यात अजूनही अनेक झाडांना मोहोर आलेला नाही. परतीचा पाऊस लांबल्यामुळे बहुसंख्य झाडांना पालवी फुटलेली होती. जून असलेल्या झाडांचा टक्का कमी होता. पाऊस पडत राहिल्यामुळे ऑक्टोबर हीटचा तेवढा प्रभाव जाणवलेला नाही.
हापूस कलमांच्या मुळात पाणी राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात पालवी दिसू लागली. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यानंतरही थंडीचा हंगाम लांबला. मागील आठवड्यात अचानक अपेक्षेपेक्षा किमान तापमान खाली घसलेले होते. १० ते १२ अंश सेल्सिअसपेक्षाही खाली नोंद झाली होती. दापोलीत ८.८ अंशावर पारा आल्यामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला; मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झालेला आहे. त्यामुळे किमान तापमान २२ ते २४ अंशावर पोहोचलेले आहे. गेले ३ दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा फटका हापूसला बसला आहे. हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे हापूसच्या ज्या झाडांना पालवी आलेली नव्हती त्यांनाही पालवी फुटण्याची भीती आहे. तसे झाले, तर मे अखेरीस येणाऱ्या आंब्याचे प्रमाण अधिक राहील, अशी शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.
दरम्यान, पाऊस लांबल्यामुळे यंदा हापूसचा हंगाम दीड महिने लांबणार आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात आला होता तसेच दरही चांगला मिळाला होता. यावर्षी तशी परिस्थिती राहणार नाही.
मलावी आंब्याचे वाशीत आगमन – साऊथ आफ्रिकेमधील मलावी आंब्याचे वाशी बाजारात आगमन झाले आहे. हापूससारखा दिसणारा हा आंबा चवीलाही चांगला असल्यामुळे मुंबईतील ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे. हापूस आंबा येण्यापूर्वी मलावीला चांगला दर मिळत आहे.