गेली १४ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी आता थेट राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांच्याकडेच लक्ष घालण्याची मागणी केली असून, मुंबई- गोवा महामार्ग रखडवणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे. याबाबत त्यांनी एक निवेदन सादर केले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०१० पासून सुरू करण्यात आले आहे; मात्र गेली १४ वर्षे झाले तरी या महामार्गाचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर या प्रशासकीय नाकर्तेपणा व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आजपर्यंत निरापराध लोकांचे बळी गेले आहे.
तरी देखील शासन, प्रशासन आणि संबंधित ठेकेदार हे या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. १४ वर्षांहून अधिक कालावधी लागलेल्या या रस्त्यामुळे कोकणातील पर्यटन व्यवसाय पूर्णतः धोक्यात आले असून, त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणत वाढत असून पर्यटक कोकणाकडे येत नसल्याने येथील आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. आता आपण कोकणातील जनतेला न्याय द्यावा व या महामार्गाच्या रखडवलेल्या जबाबदार शासन व प्रशासनाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्यपाल यांच्याकडे दत्ता कदम यांनी केली आहे.
तत्परतेने वृक्ष लागवड नाही – महामार्गाचे काम गेली १४ वर्षे रखडले गेले आहे. या महामार्गालगत असणारी वड, पिंपळ, आंबा अशी अन्य महत्त्वपूर्ण वृक्ष यांची अक्षरशः कत्तल करण्यात आली; मात्र त्याच तत्परतेने वृक्ष लागवड करण्यात आली नाही. त्यामुळे हा महामार्ग ओसाड वाटत आहे. आता संबंधित विभागाच्या वतीने झाडे लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे; मात्र ही सर्व झाडे लावणे म्हणजे केवळ फार्स आहे. त्याबाबत देखील आपण चौकशी करून कारवाई करावी व या बेसुमार वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होत आहे त्याकडे देखील संबंधित विभाग दुर्लक्ष करताना दिसून बेत आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणीही कदम यांनी केली आहे.