गुहागर-विजापूर मार्गावरील कुंभार्ली घाटात काही दिवसांपूर्वी कार दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. या घाटात गेल्या काही वर्षात वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे घाटात सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना आखण्यात याव्यात, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडत शासनाचे लक्ष वेधले. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्ग, कळंबस्ते रेल्वे फाटक येथील ओव्हरब्रीज, मतदारसंघातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, कामथे उपजिल्हा रुग्णालय येथे २०० बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात यावे, या मागण्याही आमदार निकम यांनी मांडल्या. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मांडून आमदार निकम यांनी शासनाचे लक्ष वेधले. यावेळी आमदार निकम म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा गुहागर-विजापूर मार्गावरील कुंभार्ली घाट महत्त्वाचा आहे. हा घाट वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक बनलेला आहे. काही दिवसांपूर्वी कुंभाली येथील विश्वजित व श्रीकांत खेडेकर हे पुणे येथून कुंभालींत येत होते.
त्यांची गाडी अवघड वळणावर दरीत कोसळली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. दोन दिवस त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. अखेर येथील ग्रामस्थ व पोलिसांच्या सहकायनि त्या दोघांचा शोध घेण्यात आला. ही घटना पाहता घाटातील परिस्थिती समजून येते. या घाटात उत्तम दर्जाचे संरक्षण कठडे उभारणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर सुरक्षिततेच्यादृष्टीने काही उपाययोजना आखण्याची गरज आहे, असे मुद्दे आमदार निकम यांनी मांडले.’कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण रेल्वेस्थानकानजीक कळंबस्ते येथे रेल्वे फाटक आहे. तेथे ओव्हर ब्रिज बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. गेल्या काही दिवसात इलेक्ट्रॉनिक्स फाटक आयत्यावेळी बंद होत नाही. यामध्ये सुरक्षेच्या अन्य उपाययोजना तिथे केलेल्या असल्यामुळे सुदैवाने कोणताही अनर्थ घडलेला नाही. तरीही अधिकच्या सुरक्षिततेसाठी कळंबस्ते फाटकाजवळ ओव्हर ब्रिज बांधण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
दुतर्फा वृक्ष लागवड करा – सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे. यावर कार्यवाही झालेली नाही. भविष्यात वृक्ष लागवड करताना देशी वृक्षांना प्राधान्य द्यावे आणि त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी, असे निकम यांनी सांगितले.