मराठा सर्वेक्षणाच्या कामासाठी संगमेश्वर तहसीलदारांनी प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे प्रशिक्षण देवरूख येथे आयोजित केले होते. या सर्वेक्षणात शिक्षकांना मार्गदर्शन करताना तहसीलदारांनी शिक्षक आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना थेट मेंढराची उपमा देऊन अपमानित केले. शिक्षक शाळेत काय काम करतात हे आम्हाला माहिती आहे, असे सांगून शिक्षकांच्या शैक्षणिक कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. यामुळे संतप्त शिक्षक संघटनांनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
तहसीलदार अमृता साबळे यांनी यापूर्वी बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. जशी सर्व मेंढरं एकापाठोपाठ एक जातात तसे तुम्ही मेंढरासारखे करू नका, असे उपस्थित शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना तहसीलदार साबळे यांनी संबोधल्याने उपस्थित सर्व कर्मचारी नाराज झाले. याची दखल संघटनेने घेतली आणि सर्वेक्षणाच्या कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांची तातडीची बैठक सोमवारी सायंकाळी देवरूखात झाली.
बैठकीला समितीचे दिलीप महाडिक, रमेश गोताड आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये शिक्षकांना मेंढराची उपमा देत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या तहसीलदार अमृता साबळे या लिखित स्वरूपात दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यंत मराठा सर्वेक्षणाच्या कामावर सर्व शिक्षक संघटना बहिष्कार घालणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले. तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी रत्नागिरी येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यामुळे सर्वेक्षणाचे काम वेळेत पार न पडल्यास त्याला तहसीलदार जबाबदार राहतील, असेही नमूद केले आहे.