स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहाची वातानुकूलित यंत्रणा पूर्णपणे बदलली आहे. नवीन व्हीआरएफ (व्हेरिएबल रेफ्रिजरंट फ्लो) यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे कूलिंग चांगल्या प्रकारे होईल. छताच्या संपूर्ण पत्र्यांखाली ६ इंचाचा इन्सुलेशन थराचे कोटिंग आहे. अद्ययावत साउंडसिस्टिम बसवण्यात आली असून, नाट्यगृह पूर्णपणे अॅकॉस्टिक करण्यात आले आहे. २६ जानेवारीला सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे उपमुख्याधिकारी इंद्रजित चाळके यांनी दिली. पालिकेत पत्रकार परिषदेत ते म्हणाले, पालिकेच्या वि. दा. सावरकर नाट्यगृहाची दुरवस्था झाली होती.
अनेकांच्या तक्रारी होत्या. नाट्यकर्मीनीही नाट्यगृहाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी केली होती. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी १० कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ७ कोटी मंजूर झाले आहेत. निर्माण ग्रुपच्या माध्यमातून नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम ७० दिवसात करण्यात येणार होते. त्यानुसार हे काम पूर्ण होत आले आहे. नाट्यगृहामध्ये स्टेज लाईटसुद्धा पूर्णपणे नवीन बसवण्यात आली आहे. त्यामध्ये पार लाईट, कॅन लाईट, स्पॉटलाईट आदींचा समावेश आहे. आता आवाज सुस्पष्ट ऐकू येणार आहे.
खुर्च्छा आणि स्टेजवरील पडदा, ट्रॅक, विंग नवीन बसवण्यात आली आहे. ग्रीन रूम आणि व्हीआयपी खोल्यांचे रिनोव्हेशन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतागृह, पाणीव्यवस्था व इतर अनुषंगाने कामेसुद्धा करण्यात आली आहेत. स्वतंत्र वीजजोडणी आहे तसेच जनरेटरचीही व्यवस्था आहे. नाट्यगृहामध्ये फायरसिस्टिम बसवण्यात आले आहे; मात्र नाट्यगृहाच्या नवीन भाडे आकारणीबाबत अजून निर्णय झालेला नाही. यापुढे नाट्यगृहात कचरा होऊ नये यासाठी बाहेरच्या वस्तू खाऊ दिल्या जाणार नाहीत.