औष्णिक वीजप्रकल्पातून वीजनिर्मिती करताना बाहेर पडणाऱ्या सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने फ्लू गॅस डीसल्फरायझेशन (एफजीडी) यंत्रणा बसवणे बंधनकारक केले आहे. ही एफजीडी यंत्रणा बसवण्यासाठी महानिर्मितीला तब्बल ५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा खर्च वीज ग्राहकांकडून वसूल करण्यासाठी एमईआरसीने परवानगी दिली आहे. त्यामुळे महानिर्मितीच्या प्रतियुनिट विजेचा दर तब्बल ३० पैशांनी वाढणार असून तो सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी बसणार आहे. महानिर्मितीची औष्णिक वीजनिर्मिती क्षमता १० हजार मेगावॅटच्या घरात आहे.
या वीज प्रकल्पांमध्ये एफजीडी यंत्रणा बसवणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. ही यंत्रणा बसवण्यासाठी प्रतिमेगावॅटमागे तब्बल ७५ लाख रुपयांचा खर्च आहे. महानिर्मितीने पहिल्या टप्प्यात कोराडी, खापरखेडा आणि पारस वीजकेंद्रातील सुमारे ११३० मेगावॅट क्षमतेच्या ५ संचांमध्ये एफजीडी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्याला सुमारे ८५० कोटी रुपये खर्च येणार आहे तसेच सर्व वीजकेंद्रांमध्ये एफजीडी यंत्रणा पुढील दोन वर्षांत बसवणे बंधनकारक आहे. त्यासाठी पाच हजार कोटी रुपये एवढा प्रचंड खर्च येणार आहे. त्यामुळे प्रतियुनिट विजेच्या दरात मोठी वाढ होणार आहे.