28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

तटरक्षक दलाचा टिळक रुग्णालयाबरोबर करार

भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित...

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...
HomeRajapurवेत्ये किनारी राज्यातील पहिले कासवाचे घरटे

वेत्ये किनारी राज्यातील पहिले कासवाचे घरटे

मागील वर्षी २०२२ मध्ये महाराष्ट्रात पहिले घरटे वेळास (ता. मंडणगड) येथील समुद्रकिनारी १५ नोव्हेंबर रोजी मिळालेले होते.

कासवांच्या विणीच्या हंगामात यंदा महाराष्ट्र राज्यातील पहिले कासव घरट्याचा मान राजापूर तालुक्यातील वाडावेत्ये- तिवरे या गावाला मिळाला आहे. येथील कासवमित्र गोकुळ जाधव यांना गुरुवारी (ता. २६) किनाऱ्यावर फिरताना कासवाने ११५ अंडी घातल्याचे निदर्शनास आले. ती अंडी किनाऱ्यालगत तयार करण्यात आलेल्या हॅचेरीमध्ये सुरक्षित ठेवली आहेत. यंदा एक महिना आधी विणीच्या हंगामाला सुरुवात झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. वाडावेत्ये येथील समुद्रकिनारी कासवामित्र गोकुळ जाधव हे गस्त घालत असताना त्यांना वाळूमध्ये ऑलिव्ह रिडले या समुद्री कासव मादीने घरटे तयार केल्याचे आढळून आले.

मागील वर्षी २०२२ मध्ये महाराष्ट्रात पहिले घरटे वेळास (ता. मंडणगड) येथील समुद्रकिनारी १५ नोव्हेंबर रोजी मिळालेले होते. त्यानंतर महाराष्ट्रात अन्य समुद्रकिनारी कासवांची घरटी आढळण्यास सुरुवात झाली होती. कोकणात नोव्हेंबर ते मे या कालावधीत सागरी कासवांच्या विणीचा हंगाम असतो. यंदाच्या हंगामातील पहिले घरटे ऑक्टोबर महिन्यातच सापडले आहे. वनविभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यात ४, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १४ किनाऱ्यावर कासवांची वीण होते. राजापूर तालुक्यातील तिवरे, वाडावेत्ये आणि आंबोळगडचा किनारा कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध आहे.

गेल्या वर्षी या किनाऱ्यावर ९ घरटी मिळाली होती. याच किनाऱ्यावर यंदा महाराष्ट्रातील पहिले घरटे कासवाने तयार केले आहे. जिल्ह्यामध्ये ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन व संरक्षणांचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने काम सुरू आहे. परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर यांनी वाडावेत्ये येथील कासवमित्रांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

Most Popular