मी फक्त राजकीय निवृत्तीची भाषा केली आणि संपूर्ण सरकार जणू कामाला लागले. घाईघाईत राजापूर येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सरकारने खास बाब म्हणून मंजूर केले. ये डर अच्छा लगा; पण इतकीच जर माझ्या राजकीय निवृत्तीची घाई असेल तर रत्नागिरी शहरात जी रस्त्यांची व पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था करून ठेवली आहे ती अशाच पद्धतीने सुधारून दाखवा. मी निवृत्ती घ्यायला तयार आहे, असे रोखठोक प्रत्युत्तर आमदार राजन साळवी यांनी दिले. सलग पाच वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात राहणाऱ्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर राजापूरची आठवण यावी, हा निव्वळ फुसका बार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
तालुक्यातील वाटुळ येथील प्रस्तावित सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला शासनाने मंजुरी दिली. या मंजुरीवरून पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार साळवी यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले. आमदार साळवी म्हणाले, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वाटुळ येथील जागा मी निवडली होती. त्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला होता. त्याचे सर्व कागदोपत्री पुरावेही माझ्याकडे आहेत. प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच राज्यामध्ये सत्ताबदल झाला तेव्हापासून हा विषय रखडून ठेवण्यात आला होता. हॉस्पिटल मंजुरीचा महत्त्वाचा विषय केवळ राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी राखून ठेवला होता.
गेली अडीच वर्षे उदय सामंत पालकमंत्री आहेत. त्यांची इतकीच मोठी ताकद जर सरकारमध्ये होती तर मग त्यांनी पहिल्या सहा महिन्यांत हॉस्पिटल का मंजूर करून घेतले नाही? मुख्यमंत्री तुमचे, आरोग्यमंत्री तुमचे, तुम्ही स्वतः सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मग इतका उशीर का झाला? आता सर्व काही हातातून निसटून जात आहे आणि विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. यापुढे आपल्याकडे संघी नाही, हे लक्षात आल्यावर घाई सुरू केली. त्यातच मी आव्हान दिले. त्यामुळे अतिघाई झाली. राजन साळवी काय करू शकतौ, हे माहीत असल्याने मग राजापूरच्या जनतेचा कळवळा उफाळून आला. आपले वजन वापरण्याची नामुष्की ओढवली.