गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या थरारक हत्याकांडाने कोट गावासह संपूर्ण लांजा तालुका हादरून गेला आहे. मात्र या हत्याकांडाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे पाहून गावकरी मंडळी अक्षरश: सूत्र झाली आहेत.
चांदवडे कुटुंबियांवर आघात – आणि पोलिसांकडून पत्रकारांना याबाबत घटनास्थळावरून देण्यात आलेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे संदेश रघुनाथ चांदवडे (३५ वर्षे) हा आपली आई आशा रघुनाथ चांदवडे, पत्नी सोनाली संदेश चांदवडे (२५ वर्षे) मुलगा प्रणव संदेश चांदवडे (६ वर्षे) आणि दुसरा मुलगा पियुष संदेश चांदवडे (३ वर्षे) यांच्यासह राहत होता. संदेश चांदवडे हा आपल्या मामाच्या म्हणजे प्रकाश शांताराम पाष्टे यांच्या घरात राहत होता. पाष्टे यांचे सर्व कुटुंब हे ठाणे येथे राहते. तर संदेश चांदवडे हा आपली पत्नी आई आणि मुलांसह मामाच्या घरी कोट पाष्टेवाडी येथे राहतो. सौ. सोनाली चांदवडे हिचे माहेर सांगली येथील आहे.
सुखाचा संसार – संदेश चांदवडे हा बीज मीटर रिडींग घेणे आणि वीज बिले वाटण्याचे काम करतो. पत्नी आणि दोन मुलांसह त्याचा सुखाचा संसार सुरू होता. संदेश हा स्वभावाने अतिशय शांत होता. कुठल्याही प्रकारचे त्याला व्यसन देखील नव्हते असे शेजाऱ्यांकडून सांगण्यात आले. आजूबाजूच्या लोकांशी देखील त्याचा फारसा संपर्क नव्हता.
६ वर्षाच्या मुलाचा बळी – पहाटेच्या सुमारास गुरुवारी पहाटेच्या संदेश याने आपल्या ६ वर्षांचा मुलगा प्रणव याचा जीव घेतला. त्याचा गळा आवळून किंवा नाक, तोंड दाबून हा खून त्याने केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर त्याने पत्नी सोनाली हिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये ती रक्तबंबाळ होऊन जागीच गतप्राण झाली. ही घटना घराच्या पाठीमागील बाजूस घडली. या घटनेनंतर संदेश तिथून पळून गेला.
आईने फोडला हंबरडा – गुरुवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास संदेश याची आई आशा ही उठली असता तिला घरात संदेश व सुन सोनाली दिसून न आल्याने ती हाका मारत घराच्या पाठीमागे गेली. तिथे सोनाली ही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली. सून सोनालीचा मृतदेह पाहिला आणि तिने हंबरडाच फोडला. तिच्या जोरजोरात रडण्याने शेजारीपाजारी धावत आले. घरालगत असलेले विजय पाष्टे आणि संतोष राजये हे प्रथम तिच्या घरी धावून गेले. यावेळी ज्यांनी ही भयानक घटना पाहिली त्यांनी या घटनेची माहिती कोट गावच्या पोलीस पाटीलांना दिली. त्यानंतर कोटच्या पोलीस पाटीलांनी लांजा पोलिसांना या हत्याकांडाची माहिती देण्यात आली.
पोलीस दाखल – या हत्याकांडाची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घटूकडे, उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला.
नेमके कारण काय? – पत्नी आणि मुलाच्या हत्याकांडाने संपूर्ण कोट गावासह लांजा तालुका हादरून गेला आहे. मात्र या हत्याकांडाम गील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. संदेश याची पत्नी सोनाली ही ८ दिवसांपूर्वी घर सोडून गेली होती. ८ दिवसांनंतर ती पुन्हा घरी आली, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. मात्र ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली? स्वभावाने शांत असलेल्या संदेश इतका क्रूर आणि हैवान का झाला? त्याने आपल्या निष्पाप बाळाचा बळी का घेतला? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. संदेश पोलिसांच्या हाती लागल्यावर या प्रश्नांची उकल होणार आहे. मात्र या घटनेमुळे लांजा तालुका हादरून गेला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
भाड्याने रहायला येणार होते – दरम्यान, कोट येथील हत्याकांडाच्या घटनेत बळी पडलेल्या सोनाली चांदवडे आणि संदेश चांदवडे यांनी लांजा डाफळेवाडी येथे भाड्याने राहण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती हाती आली आहे. या दृष्टीने ते बुधवारी २ ऑगस्ट रोजी लांजा डाफळेवाडी येथे आले होते आणि त्यांनी रूमदेखील बुक केली होती. या रूमची त्यांनी बुधवारी सायंकाळी साफसफाई केली. गुरुवारी ३ ऑगस्टपासून ते या ठिकाणी राहायला येणार होते. मात्र गुरूवारी सकाळी हा प्रकार घडला.
कोयता जप्त – या हत्याकांडाच्या घटनेत संदेश याने पत्नीची हत्या करण्यासाठी वापरलेला कोयता घटनास्थळी आढळून आला असून तो लांजा पोलीसांनी जप्त केला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उशी आणि अन्य अंथरूण साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.
ठसेतज्ज्ञांना पाचारण – हत्याकांडाची ही घटना नेमकी केव्हा घडली याचा अंदाज नसल्याने यासाठी फॉरेन्सिक लॅब आणि अंगुली मुद्रा तज्ज्ञ यांना देखील पाचारण करण्यात आले होते. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. एस. रेपाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश सारंग, हेड कॉन्स्टे. अक्षय कांबळे, चालक श्रीकांत दाभाडे यांचा समावेश 4 होता.
डॉगस्कॉड अपयशी – पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर संदेश चांदवडे हा पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रत्नागिरी येथील डॉगस्कॉड बोलावले होते. जॅकी या डॉगने कोट पाष्टेवाडीच्या जंगलात पसार झालेल्या संदेश याचा माग करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्याला यश आले नाही. या डॉगस्कॉड पथकामध्ये हे. कॉ. एम. इ. हरचिरकर, एस. एस. कोतवडेकर यांचा समावेश होता.
दिवसभराच्या शोधकार्यानंतर अखेर आरोपी सापडला – मुलाचा आणि बायकोचा खून केल्यानंतर आरोपी संदेश रघुनाथ चांदवडे हा सकाळीच पळून गेला होता. लांजा पोलीस दिवसभर त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. पोलिसांना तो आपल्या घराकडे येईल अशी खबर मिळाली होती. त्याआधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, हे. कॉ. राजेंद्र कांबळे यांनी सापळा रचला होता. पोलिसांना मिळालेली खबर खरी ठरली आणि गुरूवारी सायंकाळी ७ वा. च्या सुमारास त्याला पकडण्यात यश मिळाले, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख यांनी पत्रकारांना दिली. त्याला गावातून लांजा पोलीस स्थानकात गुरूवारी सायंकाळी उशीरा आणण्यात आले असून चौकशी सुरू झाली होती.