शहरातील तिन्ही तलाठ्यांची पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी रत्नागिरी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे केली होती. त्यांनी दोन दिवसांत पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, अनेक कारणांकरिता तलाठी दाखल्याची व अहवालांची विद्यार्थ्यांना व पालकांना आवश्यकता भासते. रत्नागिरी शहरातील तलाठ्यांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होत आहे. याबाबत जोपर्यंत नवीन नियुक्त्या होत नाहीत तोपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीवेळी जिल्हा उपाध्यक्ष हारिस शेकासन, शहराध्यक्ष रमेश शाहा, उपाध्यक्ष रफीक मुल्लाजी, तालुकाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग शाहरूख वागले, जिल्हा सचिव आतिफ साखरकर व सुहैल भाटकर उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दोन दिवसात पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना दाखले आवश्यक असतात.