रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर तालुका या मतदारसंघात येतात. पूर्वीचे खासदार आमच्याबरोबर राहिले नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणाला ही जागा मिळावी, अशी मागणी आहे. जागेबाबत भाकित कशाला दोन दिवसांत निर्णय होईल, जो होईल तो पक्का होणार आहे. प्रत्येक पक्षाला दावा करण्याचा अधिकारी आहे. परंतु देवेंद्र फडणवीस योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असे सूचक वक्तव्य शिवसेनेचे उपनेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. प्रसार माध्यमांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी ते बोलत होते.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबतच्या तिढ्याचा अंतिम अध्याय सुरू झाला आहे. गेली दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत यांच्या बैठका झडत आहेत. त्यामुळे शिवसेनेला आशा असली तरी भाजपदेखील आपल्या भूमिकेवर ठाम आणि आग्रही आहे. कित्येक दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेचा पेच काही सुटेना. मनात आले तर भाजप याबाब आपली भूमिका स्पष्ट करून उमेदवारही जाहीर करू शकते, परंतु महायुतीचा धर्म आणि निवडून येण्याची धमक असलेल्या उमेदवारालाच महायुतीमध्ये प्राधान्य आहे.
मतदारसंघाचा आढावा घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊनच महायुती पुढचे पाऊल टाकणार आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर होण्यात अडचण येत आहे. कोकण पट्टयात पक्षवाढीला संधी मिळावी, यासाठी भाजपचा यां जागेवर आग्रह आहे. त्यासाठी त्यांनी किरण सामंत यांना भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याबाबतही ऑफर दिली होती. राजकीय परिस्थितीचा विचार करता ते शिवसेनेला आगामी निवडणुकांसाठी अडचणीचे ठरू शकते हे देखील सामंतांनी पटवून दिले आहे. त्यामुळे नारायण राणे की किरण सामंत हे अजून निश्चित नाही.