23.8 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली....

चारचाकी असलेल्या बहिणी अडचणीत, जिल्हा प्रशासनाला यादी प्राप्त

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या...
HomeRatnagiriचिपळुणात भोंदूगिरी करणाऱ्या दोघांना पकडले

चिपळुणात भोंदूगिरी करणाऱ्या दोघांना पकडले

अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील मार्कडी येथे भोंदूगिरी करणाऱ्या दोन भोंदूबाबांना येथील पोलिसांनी दोन महिलांच्या सहकायनि रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बाबूराव वायकर (५०, रा. रा. मुदखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव), अशोक देवराम जोशी (४०, रा. वावडी, ता. जामनेर, जि. जळगाव) अशी पकडलेल्या दोघा संशयित भोंदूबाबांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, गणेश व अशोक हे दोघेजण गेल्या काही महिन्यांपासून चिपळूणमधील मार्कडी येथील कुंजवन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सदनिकेत भोंदूगिरी करीत होते.

जागरूक नागरिकांनी याची माहिती घेऊन पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. यानुसार यातील एक महिला या दोन भोंदूबाबांकडे गेली. या दोघांना आपल्याला यश मिळत नसल्याचे सांगितले. यावर या दोघांनी तुमच्यावर करणी केलेली आहे. ही करणी दूर करण्यासाठी ३० हजार रुपये लागतील तर व्यवसायात यश येण्यासाठी दीड लाख रुपये लागतील, असे सांगितले. या प्रकाराने ही महिला अवाक झाली, यानंतर तिने याची माहिती आपल्या मैत्रिणीला सांगितली. यानुसार दुसरी महिला या दोघा भोंदूबाबांकडे गेली आणि तिने देखील आपल्याला यश मिळत नसल्याचे सांगितले. यावर या दोघांनी तुम्हाला यश येण्यासाठी ५० हजार रुपये लागतील.

तुम्ही पैसे घेऊन या, तुमचं काम करून देतो, असे सांगितले. हा प्रकार वेगळाच असल्याचे लक्षात आल्यानंतर या दोन महिलांनी पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना सर्व माहिती दिली. यानंतर पोलिसांनी कुंजवन इमारतीवर या दोन महिलांसमवेत छापा टाकला. यावेळी करणी दूर करण्यासाठी लिंबूसारखे साहित्य रचून ठेवल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे भोंदूबाबांनी किचन रूममध्ये बीअर ठेवल्या होत्या.

या प्रकाराबाबत पोलिसांनी खडसावले असता भोंदूबाबा बीअर पित असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले आणि वैद्यकीय तपासणीसाठी कामथे रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, फिर्यादीचे जाबजबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी दोघांवर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular