पत्नीने पतीचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याच्या वृत्ताने अवघा रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. दरम्यान या खून प्रकरणात वापरलेली कार शुक्रवारी पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. अन्य काही पुरावे मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. तसेच या खुनासाठी नेहा आणि मंगेशला अन्य कोणी मदत केली का? याचाही शोध सुरू आहे. दरम्यान संशयित आरोपी नेहा निलेश बाक्कर आणि तिचा कथित प्रियकर संशयित आरोपी मंगेश चिंचघरकर यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर नेहा आणि निलेश यांच्या २ छोट्या मुलींनी आधार गमावला असून एका अर्थाने त्या पोरक्या झाल्या आहेत. दापोलीलगतल्या गिम्हवणे गावातील निलेश बाक्कर यांच्या खुनाचे वृत्त कळताच केवळ गावच नव्हे तर अवधा जिल्हा हादरला आहे. निलेश बाक्कर यांच्या पत्नीनेच तिच्या कथित प्रियकराच्या मदतीने नायलॉनच्या रस्सीने गळा आवळून खून केला आणि मृतदेह घटनास्थळापासून २२ ते २५ किलोमीटर अंतरावरील पालगड येथील पाटीलवाडीतील विहिरीत टाकून दिला. मृतदेह टाकताना त्याच्या पाठीला लोखंडाचा पाटा बांधण्यात आला होता.
तो मी नव्हेच – विशेष म्हणजे नेहा बाक्कर हिने यानंतर जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात आपला पती बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस स्थानकात दिली. जणूकाही ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा तिने घेतला होता. मात्र पोलीसांच्या चाणाक्ष नजरेतून तिचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. नेहाने सांगितलेली वेळ आणि तिची कामावरून सुटण्याची वेळ यामध्ये तफावत आढळल्याने पोलीसांनी तपासाला वेग दिला आणि नेहाचीच चौकशी सुरू केली. पोलीसी खाक्या दाखवताच ती भडाभडा बोलू लागली.
खुनाला वाचा फुटली – दापोली पोलीसांच्या या कामगिरीमुळे निलेश बाक्क्रूरच्या खुनाला जणूकाही वाचा फुटली आणि त्याच्या बायकोनेच त्याचा खून केल्याचे उघडकीस आले. यानंतर पोलीसांनी नेहा निलेश बाक्कर आणि तिचा कथित प्रियकर मंगेश चिंचघरकर (रा. पालगड, पाटीलवाडी) या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली देताना सारा घटनाक्रम पोलीसांना सांगितला. त्यानंतर त्या दोघांनाही मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले असता, ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवरा-बायकोचे खटके – याबाबत पोलीसांकडून पत्रकारांना मिळालेल्या अधिक माहितीनुसार सौ. नेहाचे प्रेमसंबंध निलेश बाक्करला समजले होते, त्यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. नेहा आणि मंगेश यांनाही निलेश आपल्या प्रेमसंबंधात अडथळा आणतोय हे लक्षात येताच संताप आला होता. त्यातूनच आपल्या प्रेमसंबंधात अडथळा आणणाऱ्या निलेशचाच काटा काढण्याचा डाव नेहा आणि मंगेश यांनी आखला अशी माहिती या साऱ्या प्रकरणाचा छडा लावणारे दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी पत्रकारांना दिली.
सोमवारच्या सुट्टीचा उपयोग – निलेश बाक्कर याचे केशकर्तनालय सोमवारी बंद असते. दुकानाला सोमवारी असलेल्या सुट्टीचा फायदा घेत नेहा आणि मंगेशने निलेशला दारू पाजून हर्णे बायपासवर नेले. तेथे नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा घट्ट आवळून खून केला आणि त्यानंतर पालगडमधील विहिरीत पाटा बांधून टाकून दिला. हा सारा घटनाक्रम पोलीसांनी उघडकीस आणला. याबाबतचे वृत्त कळताच सारा जिल्हा हादरला असून शुक्रवारी दिवसभर या प्रेमप्रकरणातून झालेल्या खुनाची चर्चा दापोलीत नाक्यानाक्यावर संतप्त स्वराल सुरू होती.
कार घेतली ताब्यात – दरम्यान पोलीसांनी शुक्रवारी या गुन्हयाकामी वापरलेली लाल रंगाची कार हस्तगत केली आहे. दरम्यान या खुनामुळे छोट्या २ मुलींचे पितृछत्र हरपले आहे. आई कारागृहात आणि वडील जगात नाहीत अशा बिकट परिस्थितीत या दोन मुली सापडल्या आहेत.
एसटी बस चालक – याप्रकरणी अटक करण्यात आलेला नेहाचा कथित प्रियकर आणि संशयित आरोपी मंगेश चिंचघरकर हा मंडणगड एस. टी. आगारात चालक म्हणून कामाला आहे. तो मूळचा दापोली तालुक्यातील पालगड गावचा रहिवासी असून परिसरात बुवा म्हणून प्रसिध्द आहे. आता पोलीस या दोघांना अन्य कोणी मदत केली का? याचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण देशमुख करीत आहेत.