रत्नागिरीतील नाईक हायस्कूलमध्ये चोरी …

346
Theft at Naik High School in Ratnagiri

चार वर्षांपूर्वी शहरातील धनजीनाका येथील नाईक हायस्कुलमधील अॅल्युमिनियमचे ग्रिल वाकवून सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबवल्याच्या आरोपातील चार आरोपींपैकी एकाला २ वर्ष सश्रम कारावास आणि १५०० रुपये दंड तो न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे तर दुसऱ्या आरोपीला १ वर्ष चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर १० हजार रुपयांच्या बंधपत्रावर मुक्त करण्यात आले असून अन्य दोघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा निकाल मुख्य न्यायदंडाधिकारी चौत्रे यांनी दिला आहे. अकिब जिक्रिया वस्ता (२२, रा. राजीवडा, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोहम्मद अदनान इरफान वस्ता (१९, रा. नवा कर्ला, रत्नागिरी) याची बंधपत्रावर मुक्तता करण्यात आली असून उजैफ तन्वीर वस्ता (१९, रा. आदमपूर राजीवडा, रत्नागिरी) आणि मकबुल सल्लाद्दीन दाव्त (१९, रा. राजीवडा बांध, रत्नागिरी) या दोघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

त्यांच्याविरोधात अश्फाक मुश्ताक नाईक (४५, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, १२ जून २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वा. ते १५ जून २०१८ रोजी दुपारी ३ वा. कालावधीत संशयितांनी एम.एस. नाईक हायस्कुलच्या इमारतीचे अॅल्युमिनियम ग्रिल वाकवून प्रोजेक्टर, बोर्ड, माउस, बुलेट, कॅमेरा आदि १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल लांबवला होता. ही घटना शाळेतील सीसी टिव्हीमध्ये कैद झाली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयितांना १८ जून २०१८ रोजी अटक केली होती. शहर पोलिसांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षाकडून अॅड. विद्यानंद जोग यांनी तर मदतनीस म्हणून पोलिस हेड काँस्टेबल दुर्वास सावंत यांनी काम पाहिले.