ज्या रत्नागिरीने या देशाला ६ भारतरत्न दिली त्या रत्नागिरी जिल्ह्यातील १६१ शाळांमध्ये शिक्षकच नाहीत अशी दयनीय अवस्था असून तातडीने शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास शिवसेना (ठाकरे गट) उग्र आंदोलन करेल, पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू असा इशारा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत यांनी दिला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिवसेनेने आवाज उठवला असून याबाबत नुकतेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ४ डिसेंबर २०२२ च्या जीआरच्या आधारे राज्य सरकारने कोकणातील शाळा बंद करण्याचा कुटील डाव आखल्याचा आरोप खा. राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. या कुटील नीतीला अधिकाऱ्यांनी भुलू नये अशी विनंती आम्ही जि.प.च्या सीईओंना केली असून १६१ शाळांवर शिक्षकांची नियुक्ती झाली पाहिजे.
जवळपास १७५२ पदे रिक्त आहेत. ही स्थिती शोचनीय आहे. शून्य शिक्षिकी शाळा ही १०० टक्के राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाने ओढवलेली परिस्थिती आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने त्वरित शिक्षकांच्या नियुक्त्या कराव्यात. जि.प.च्या सीईओंनी सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेतले आहे. मात्र मागणी मान्य झाली नाही तर शिवसेना उग्र आंदोलन छेडेल आणि पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढेल, असा इशारा खा. विनायक राऊत यांनी दिला आहे.