लोकसभा निवडणूक महिना दीडमहिन्यावर आली असून राजकीय पक्षांनी जागा वाटपाबरोबरच उमेदवार चाचपणी देखील सुरू केली आहे. महाविकास आघाडीकडून सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा विनायक राऊत यांनाच उमेदवारी निश्चित झाली आहे. परंतु महायुतीकडून अद्याप कोणाचेच नाव पुढे येत नसल्याने ‘येथे महायुतीचा उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात यावेळी लोकसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात सामना रंगेल. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे जागा वाटप जवळजवळ पूर्ण झाले असल्याची माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळाल्या असल्याचे देखील वृत्त आहे. सुमारे २० जागांवर ठाकरे गटाने दावा केला असून त्यापैकी १८ जागांवर उमेदवार देखील निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळाला असून येथून पुन्हा एकदा विद्यम ान खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी निश्चित झाली असून मित्रपक्ष राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसने देखील राऊत यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे विनायक राऊत मतदार संघात कामाला लागले आहेत. त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील आता पासूनच कामाला लागले असून प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषद गट निहाय बैठकांचे नियोजन देखील करण्यात येत आहे. तसेच नुकताच उद्धव ठाकरे यांचा झालेला कोकण दौरा वातावरण निर्मितीसाठी अत्यंत पोषक ठरला आहे.
महायुतीतर्फे कोण? – महायुतीत ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे या बाबतच अद्याप निर्णय झालेला नाही. शिंदे गटाने या जागेवर दावा केला असून उद्योजक किरण सामंत येथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर भाजपने देखील या मतदारसंघावर दावा करून कमळ निशाणीवरच येथील लोकसभा लढली जाईल, असेही सूतोवाच नेते करत आहेत. त्यामुळे महायुतीत हा मतदारसंघ कोणाकडे जाणार या प्रश्नाचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील काहीसा संभ्रम आहे.
भाजपला मिळाल्यास उमेदवार कोण? – जर शिंदे गटाकडे हा मतदारसंघ गेला तर येथून किरण सामंत उमेदवार असणार हे निश्चित परंतु भाजपकडे जर ही जागा गेली तर मात्र उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. परंतु स्वतः नारायण राणे यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक नाही असे स्पष्ट केले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी आपण उमेदवार असू की नाही याचा निर्णय वरिष्ठ घेतील असे सांगितले आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या उमेदवारीची चर्चा अजूनही सुरू आहे.
जठार, चव्हाणांचीही चर्चा – दुसऱ्या बाजुला माजी आमदार प्रमोद जठार तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांचेदेखील नाव पुढे येत आहे. परंतु अद्याप तरी भाजपकडून त्यासंदर्भात कोणतीच जाहीर प्रतिक्रिया दिली जात नसल्याने या जागेबाबत आणि उमेदवार बाबत अद्याप महायुतीत एकवाक्यता झालेली दिसत नाही. महायुतीत या संदर्भात रस्सीखेच सुरू आहे? योग्य उमेदवाराचा शोध घेतला जात आहे? असे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत. निवडणुकांना जेमतेम दीड महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणाम ध्ये लढत होणार याविषयी अजूनही चित्र स्पष्ट नाही. एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होऊन तयारीला लागला असताना महायुतीत मात्र अजूनही वादच सुरू आहेत.